
सरकोली येथे कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासाला नवी गती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कृष्णात पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मुख्य सचिव सुधाकर भोसले यांच्यासह मान्यवरांची भेट.बोटिंग,रस्ते,पूल, जलपर्यटन,पर्यटक निवास आणि रोजगारनिर्मितीसाठी निधी व शासकीय योजनांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन
सरकोलीचे पर्यटनस्थळ महाराष्ट्रा च्या नकाशावर झळकणार? बोटिंग, जलपर्यटन अन् रोजगारनिर्मिती साठी शासनाकडे पाठपुरावा
लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या हिरव्यागार पर्यटनस्थळाची मान्यवरांकडून पाहणी; रस्ते, पूल, पर्यटक निवास आणि जलक्रीडा सुविधांसाठी विकास आराखड्याला चालना देण्याची ग्वाही.
सरकोली, ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज :गावाच्या विकासासाठी केवळ सरकारी निधीची वाट न पाहता लोकसहभाग,दानशूर व्यक्तींचे योगदान आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमांतून एखादे गाव पर्यटनाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करू शकते याचे उदाहरण सरकोली येथे पाहायला मिळत आहे.पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे विकसित होत असलेल्या कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला शनिवार दि.१७ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पर्यटनस्थळाच्या विकासा साठी अधिकाधिक शासकीय निधी आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कृष्णात पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मुख्य सचिव सुधाकर भोसले, बीडचे सहाय्यक संचालक दत्तात्रय क्षीरसागर, प्रगतशील बागायतदार तात्यासाहेब पाटील,मार्गदर्शक डॉ. संजयकुमार भोसले यांनी पर्यटन स्थळाची पाहणी केली.लोकसह भागातून उभारण्यात आलेली विविध स्थळे,बगीचे व निसर्गरम्य परिसर पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
२०२२ पूर्वीचे गाव ते आजचे पर्यटनस्थळ; बदलाचा प्रवास कौतुकास्पद
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मुख्य सचिव सुधाकर भोसले यांनी सरकोलीच्या बदललेल्या स्वरूपा बद्दल अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले की,२०२२ पूर्वीचे गाव आणि आज पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेले सरकोली यामध्ये मोठा बदल झाला आहे. हिरवीगार झाडी, बगीचे, विविध आकर्षक स्थळे आणि निसर्गसौंदर्या मुळे या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता प्राप्त झाली आहे.
या भूमीची सेवा म्हणून रांजणी ते शंकरगाव रस्ता मंजूर करून घेतल्याचे सांगताना, विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे दळणवळणाला मिळणार बळ
सरकोली आणि परिसरातील गावांच्या दळणवळणासाठी विविध रस्ते व पुलांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मुख्य सचिव सुधाकर भोसले यांनी दिली. यामध्ये सरकोली खंडोबा मंदिरा जवळ नवीन पूल,पुळूज बंधाऱ्या जवळ मोठ्या पुलाची उभारणी, मगरवाडी-पुळूज-शंकरगाव- इंचगाव यांना जोडणारा चारपदरी रस्ता आणि शंकरगाव ओढ्यावरील नवीन पूल यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या सहकार्याने ही कामे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाची परिस्थिती संपल्यानंतर संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
बोटिंग,जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्समधून रोजगाराची संधी
सरकोलीच्या पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील मोठा जलसाठा.या जलसाठ्याचा नियोजनबद्ध वापर करून पर्यटकांसाठी बोटिंग, जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.यामुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवे मार्गही खुले होऊ शकतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कृष्णात पाटील म्हणाले की,सुधाकर भोसले यांच्या विनंती वरून आपण सरकोली येथे आलो. लोकसहभागातून आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून इतकी कामे उभी राहिल्याचे पाहून आश्चर्य वाटले.गावकरी आणि पर्यटनस्थळा वर सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आणखी अनेक सुविधा विकसित करता येतील. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटनस्थळां च्या यादीत सरकोलीला अग्रस्थान मिळावे,यासाठी विविध शासकीय योजना आणि निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कृष्णात पाटील यांनी दिले.
युवकांना जलक्रीडा प्रशिक्षणाची दिशा
जलपर्यटनासोबतच जलक्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना नवे व्यासपीठ मिळू शकते,असा विश्वास कृष्णात पाटील यांनी व्यक्त केला.नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.सरकोलीतील युवकांनी तेथील उपक्रमांची माहिती घ्यावी तसेच प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले.
योग्य प्रशिक्षण,सुविधा आणि संधी उपलब्ध झाल्यास सरकोलीतील युवकांना कौशल्यविकास,रोजगार आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

पर्यटक निवास,स्वच्छतागृहे आणि सौरदिव्यांसाठी पाठपुरावा
पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी घाट,पर्यटक निवास व्यवस्था,स्वच्छतागृहे,स्नानगृहे, नवीन गावठाणापासून पर्यटन स्थळापर्यंत सौरऊर्जेवरील दिवे आणि बोटिंगसाठी धक्के उभारण्याची आवश्यकता असल्याचे सुधाकर भोसले यांनी सांगितले.याशिवाय प्राथमिक शाळा आणि हायस्कूलशी संबंधित विकासकामांसाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पर्यटनस्थळ विकसित करताना कोणतेही राजकारण न करता सर्वांनी आपापल्या परीने योगदान द्यावे आणि गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पर्यटनविकासासाठी सरकोली समविचारी आघाडीचे निवेदन
सरकोली गाव आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनाने अधिकाधिक निधी मंजूर करावा,या मागणीसाठी सरकोली समविचारी आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले.डाळिंब रत्न दत्तात्रय साहेबराव भोसले आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका भोसले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णात पाटील यांच्याकडे हे निवेदन सादर केले.
या निवेदनातून पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
पुळूज बंधाऱ्यात उजनीचे पाणी अधिक क्षमतेने सोडण्याची मागणी
पर्यटनविकासासोबतच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या भेटी दरम्यान मांडण्यात आला.शेतकरी संघटनेचे निवास काका भोसले यांनी शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुळूज बंधारा उजनी धरणाच्या पाण्याने अधिक क्षमतेने भरून द्यावा, अशी मागणी केली.
या मागणीला महत्त्व आहे; कारण पाण्याची उपलब्धता,शेतीचे स्थैर्य आणि पर्यटनविकास यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट संबंध आहे. जलसाठ्याचे योग्य नियोजन झाल्यास शेतीला मदत मिळण्या बरोबरच जलपर्यटनाच्या संधी विकसित करण्यासाठीही अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सरकोलीसमोर आता अंमलबजावणीचे आव्हान
सरकोलीने लोकसहभागातून पर्यटनस्थळ उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल केली आहे.मात्र या प्रयत्नांना कायमस्वरूपी आर्थिक आणि सामाजिक लाभात रूपांतरित करण्यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा, पर्यावरणपूरक पर्यटन, सुरक्षित जलक्रीडा सुविधा, स्वच्छता, पाणीव्यवस्थापन आणि स्थानिक युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आवश्यक ठरणार आहे.
मान्यवरांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्ष निधी मंजुरी, प्रशासकीय मान्यता आणि कामांच्या सुरुवाती पर्यंत पोहोचल्यास सरकोलीला कृषी,निसर्ग आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची संधी मिळू शकते.या भेटीची माहिती माजी पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी दिली.
