Tuesday, October 27

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथे झालेल्या या परिसंवादात डॉ.गीताली वि.मं.,डॉ. अदिती काळमेघ,शिल्पा कांबळे, अमृता खंडेराव, डॉ.प्रतिभा जाधव, डॉ.विनया जंगले आणि हीना कौसर खान सहभागी झाल्या होत्या. लेखिका व माध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांच्या लेखनातून समाजातील दुर्लक्षित अनुभवांना अभिव्यक्ती मिळण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण, श्रमकरी, बहुजन आणि विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांचे अनुभव साहित्याच्या केंद्रस्थानी आले, तर समाजाच्या जाणिवा अधिक व्यापक होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. स्त्रियांना निर्भयपणे व्यक्त होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच नवोदित लेखिकांना प्रकाशन आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या संधी मिळाल्या पाहिजेत. स्त्रियांचे लेखन समतेच्या दिशेने कृती घडवणारे ठरावे, ही त्यांची भूमिका होती.

स्त्रीवाद हा पुरुषविरोधी विचार नसून लोकशाही,सहिष्णुता, विविधता,अहिंसा आणि माणुसकीवर आधारित विचार आहे, असे डॉ. गीताली वि.मं. यांनी स्पष्ट केले.स्त्री,पुरुष आणि विविध लैंगिक ओळखी असलेल्या व्यक्तींनी समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेच्या चौकटी ओलांडून समान माणूस म्हणून जगावे, हा स्त्रीवादी विचाराचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की त्यांच्यावर कुटुंब मोडण्याचे आरोप केले जातात. मात्र, अन्यायाला विरोध करणे म्हणजे कुटुंबाला विरोध करणे नव्हे, असे त्यांनी नमूद केले. स्त्रीवादा विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि स्वतःशी मोकळा संवाद साधण्यासाठी लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढणेही समतेच्या प्रवासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना भेटलेल्या स्त्रियांचे संघर्ष आपल्या लेखनाची प्रेरणा ठरल्याचे डॉ.अदिती काळमेघ यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहणे, नकारात्मक अनुभव पचवणे आणि उद्याच्या आशेने जगणे, ही ग्रामीण स्त्रियांची ताकद आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, असे त्या म्हणाल्या.

शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन असूनही स्त्रीचे आत्मभान आणि स्वाभिमान आपोआप जागृत होतातच असे नाही. समाजाच्या नजरेतून स्वतःची ओळख शोधणे आणि सौंदर्यभानालाच आत्मभान समजणे,या प्रवृत्तींचे त्यांनी विश्लेषण केले. अनुभव, निरीक्षण आणि चिंतन यांच्या आधारे कविता, कथा आणि लेख आकाराला येतात. चुकीचे घडताना त्याविरोधात बोलणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्याय सहन होत नाही म्हणून मी लिहिते,अशा स्पष्ट शब्दांत शिल्पा कांबळे यांनी आपल्या लेखनप्रेरणेचे वर्णन केले. वाचत असलेल्या साहित्यात स्वतःच्या अनुभवांचे आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याचे पुरेसे प्रतिबिंब दिसत नसल्याची जाणीव झाल्यानंतर ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

लेखन हे विचार मांडण्याबरोबरच स्वतःला सावरण्याचे आणि जगण्याची ताकद मिळवण्याचे माध्यम ठरल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

काही साहित्यिक व्यक्तिरेखांनी कठीण काळात आपल्याला आधार दिला,असे त्या म्हणाल्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील मालिकेच्या लेखनातून त्यांचे विचार मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. आपली गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पुस्तकांबरोबरच दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपट यांसारख्या माध्यमांचाही आधार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण स्त्रियांचे दुःख त्यांच्याच भाषेत मांडते : अमृता खंडेराव

यवतमाळच्या अमृता खंडेराव यांनी ग्रामीण स्त्रियांच्या जगण्यातील वास्तव त्यांच्याच भाषेत मांडण्यामागील भूमिका स्पष्ट केली. विदर्भातील खाद्यसंस्कृती आणि स्त्रियांच्या जीवनशैलीविषयी समाजमाध्यमांवर लिहिताना काही शहरी वाचकांनी त्या वास्तवावर अविश्वास व्यक्त केला. टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागल्या नंतर ग्रामीण जीवन अधिक ठामपणे मांडण्याची गरज जाणवल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी भरण्यापासून स्वयंपाक आणि शेतीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्रियांना स्वतःच्या गरजा आणि निर्णयांच्या बाबतीत दुय्यम स्थान मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण स्त्रियांच्या संघर्षातील धैर्य, विनोदबुद्धी आणि आनंद शोधण्याची वृत्ती समोर आणण्यासाठी विनोदी लेखनाचा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले.

विद्रोह म्हणजे विध्वंस नव्हे, तर सत्यावर ठाम राहणे, अशी भूमिका डॉ. प्रतिभा जाधव यांनी मांडली. संत कवयित्रींपासून आधुनिक लेखिकांपर्यंतच्या वैचारिक परंपरेचा संदर्भ देत त्यांनी स्त्रियांना प्रश्न विचारण्याचा आणि स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित केले.

लेखनातून एखाद्या व्यक्तीच्या जाणिवेत बदल झाला किंवा तिने स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा विचार सुरू केला, तरी ती महत्त्वाची उपलब्धी असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्तन यांत सुसंगती असणे आवश्यक आहे. शिक्षण घेऊनही चुकीला चूक म्हणण्याचे धैर्य नसेल, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी सादर केलेल्या अनुवादित ‘चेटकिणी’ या कवितेतून प्रश्न विचारणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या आणि तडजोड नाकारणाऱ्या स्त्रियांकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, याचे चित्र उभे राहिले.

IMG_20261027_231945

प्राण्यांचे दुःख आणि पर्यावरणाची हानी समाजापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने लेखन करीत असल्याचे डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या पशुवैद्यकीय आणि वन्यजीव उपचार क्षेत्रात महिला म्हणून काम करताना सुरुवातीला स्वतःची क्षमता वारंवार सिद्ध करावी लागल्याचे अनुभव त्यांनी मांडले.

प्रत्यक्ष कामातून दिसणारे प्राण्यांचे वर्तन, त्यांचे भावविश्व आणि त्यांच्या वेदना यांची नोंद साहित्याच्या माध्यमातून जतन झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.वन्यप्राण्यांच्या उपचारां दरम्यान आलेले वेदनादायी प्रसंग आणि अनेक वर्षांनंतरही ओळख दाखवणाऱ्या आपण वाढवलेल्या बिबट्याचा भावनिक अनुभव त्यांनी कथन केला.माणसांप्रमाणेच प्राण्यांचेही भावविश्व असते, याची जाणीव समाजाला करून देणे ही आपल्या लेखनाची प्रेरणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लेखनाच्या आवडीतून पत्रकारितेकडे वळलेल्या हीना कौसर खान यांनी धार्मिक ओळख, माध्यमांतील प्रतिनिधित्व आणि सामाजिक वास्तव यांविषयीचे अनुभव मांडले. मुस्लिम समाजाचे माध्यमांमध्ये मर्यादित आणि ठरावीक स्वरूपात चित्रण होत असल्याची जाणीव अस्वस्थ करणारी होती. या चौकटीपली कडील माणसे, त्यांचे अनुभव आणि समाजजीवन मांडण्याची गरज वाटल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवस्थेतील विसंगती, नात्यांतील व्यवहार, प्रेम आणि सहवासाचा अभाव यांविषयीची अस्वस्थता लेखनाला प्रवृत्त करते, असे त्या म्हणाल्या. पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणाचे वार्तांकन करताना आलेल्या अनुभवांनी अशा विषयांची नोंद घेण्याची गरज अधिक तीव्र केली. त्या काळातील घटनांचे दस्तऐवजीकरण झाले नाही, तर भविष्यात त्यांचा विपर्यास होऊ शकतो. त्यामुळे लेखन हे सामाजिक वास्तव जतन करण्याचे माध्यमही आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

IMG_20261027_232035

परिसंवादाच्या सूत्रसंचालक मुक्ता चैतन्य यांनी समाजमाध्यमांमुळे स्त्रियांना स्वतःचे अनुभव आणि विचार व्यक्त करण्यासाठी नवी व्यासपीठे उपलब्ध झाल्याचे नमूद केले. मात्र, स्त्रीने काय लिहावे, काय लिहू नये आणि कोणते शब्द वापरावेत, याबाबतची सामाजिक बंधने अजूनही कायम आहेत. ही बंधने ओलांडण्याबरोबरच स्त्रियांच्या लेखनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चौदाव्या नांदी संमेलनांतर्गत आयोजित या स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या, तर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि स्त्री आधार केंद्र यांच्या सहभागातून संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

‘मी का लिहिते?’ या प्रश्नातून उलगडलेले सात लेखिकांचे अनुभव स्त्रियांचे लेखन हे केवळ वैयक्तिक अभिव्यक्ती नसून उपेक्षितांच्या जगण्याची नोंद, अन्यायाविरुद्धचा आवाज आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचे साधन ठरू शकते, हा विचार अधोरेखित करणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *