Wednesday, November 11

तुकाराम मुंढेंकडे आरोग्य विभागाची धुरा द्या! श्रीकांत शिंदेंची मागणी; पंढरपूर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश

दरम्यान पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीचा मुद्दा या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच रुग्णांवरील उपचारातील कथित हलगर्जीपणा, शस्त्रक्रियांची संख्या, रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव आणि रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्याचे प्रकार यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शासकीय रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.मात्र अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती,उपचारातील दिरंगाई,प्रशासकीय निष्काळजी पणा आणि औषधोपचारांमधील त्रुटींमुळे सामान्य रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा केवळ कागदोपत्री प्रशासकीय विभाग न राहता सामान्य नागरिकांना विश्वासाने उपचार मिळवून देणारी सक्षम व्यवस्था बनली पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

IMG_20261106_094425

श्रीकांत शिंदे , आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

प्रशासकीय शिस्त, कर्तव्यनिष्ठा, स्पष्टवक्तेपणा आणि कामातील कार्यक्षमतेसाठी परिचित असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण प्रशासकीय जबाबदारी सोपविल्यास विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडू शकतो,असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य विभागातील अनियमितता रोखणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, शासकीय रुग्णालयांमधील सेवा सुधारणा आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कठोर व कार्यक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने रुग्णालयाच्या कामकाजाची तपासणी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या चौकशीतून नेमके काय समोर येते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *