Thursday, October 29

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील कलावंत गमावला-आमदार सत्यजीत तांबे

मुरुड-जंजिऱ्याच्या मातीतून आलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र आणि अढळ स्थान निर्माण केले. ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या विविध चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

त्यांच्या प्रभावी अभिनयाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मश्रीसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले.संवादफेकीची खास शैली,व्यक्तिरेखेत पूर्णपणे झोकून देण्याची क्षमता आणि पडद्यावरचा प्रभावी वावर यामुळे नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.

नाना पाटेकर यांच्या पडद्यावरील भूमिका जितक्या प्रभावी होत्या, तितकीच त्यांची सामाजिक बांधिलकीही उल्लेखनीय होती. दुष्काळग्रस्त शेतकरी,आत्महत्या ग्रस्त कुटुंबे आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी नाम फाउंडेशन च्या माध्यमातून केलेले कार्य त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरले.

प्रसिद्धीच्या झोतात न राहता साधेपणाने जगत त्यांनी सामाजिक कार्याला दिलेले योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. अभिनयासोबतच समाजातील गरजू घटकांसाठी उभे राहणारा कलाकार म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले की, नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर आपल्या मातीशी जोडलेला संवेदनशील माणूस होते. त्यांच्या अभिनयाचा ठसा अनेक पिढ्यांच्या मनावर राहील; मात्र समाजातील वंचित आणि शेतकरी बांधवांसाठी त्यांनी केलेले कार्यही तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांचा आवाज, त्यांची भूमिका आणि त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.

नाना पाटेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आमदार सत्यजीत तांबे यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *