Wednesday, October 28

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे ज्ञान, संवेदनशीलता,सामूहिक सजगता आवश्यक : डॉ.नीलम गोऱ्हे

महिला दक्षता समिती सदस्य व महिला सुरक्षा स्वयंसेविकांना ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रांचे वितरण

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे ज्ञान,संवेदनशीलता आणि सामूहिक सजगता आवश्यक : डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ सप्टेंबर २०२६ :गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला, मुली आणि बालकांची सुरक्षितता अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्यावतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला दक्षता समिती सदस्य आणि महिला सुरक्षा स्वयंसेविकांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचे वितरण शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपटे सभागृहात करण्यात आले.

blank

स्त्री आधार केंद्राच्यावतीने दि.८, ११,२९ व ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये स्वयंसेविकांना महिला व बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित १५ महत्त्वपूर्ण कायद्यांची माहिती देण्यात आली.कायद्यांमधील तरतुदी, तक्रार नोंदविण्याची पद्धत, पीडित महिलांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे, संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्या आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदे अस्तित्वात असणे पुरेसे नाही. त्या कायद्यांची माहिती समाजातील महिलांपर्यंत पोहोचणे आणि गरजेच्या वेळी त्यांचा योग्य उपयोग करता येणे तितकेच महत्त्वाचे आहे.महिला दक्षता समिती सदस्य आणि सुरक्षा स्वयंसेविकांनी कायद्याचे ज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि प्रसंगावधानाच्या आधारे सक्रियपणे काम करावे.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीला कायद्यातील काही शब्द, प्रक्रिया आणि प्रश्नावली समजून घेताना अनेक स्वयंसेविकांना अडचणी आल्या.मात्र त्यांनी सातत्याने प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या आणि प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर त्यांच्या ज्ञानात, आत्मविश्वासात आणि संवादकौशल्यात झालेली वाढ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

प्रशिक्षण केवळ प्रमाणपत्र मिळविण्यापुरते मर्यादित राहू नये. स्वयंसेविकांचे काम अधिक कार्यक्षम, कृतीशील आणि परिणामकारक व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कायदे, नियम आणि उपलब्ध संस्थात्मक यंत्रणांची माहिती मिळणे हे महिला सुरक्षेच्या दिशेने टाकलेले पहिले महत्त्वाचे पाऊल आहे,असेही त्यांनी सांगितले.

ओळखपत्रांमुळे स्वयंसेविकांना कोणतेही वैधानिक किंवा पोलीस अधिकार मिळत नसले तरी त्यांना सार्वजनिक ठिकाणी काम करताना अधिकृत ओळख,आत्मविश्वास आणि स्त्री आधार केंद्राचा संस्थात्मक आधार मिळणार आहे. एखाद्या महिलेला त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वयंसेविकांनी स्वतःहून संघर्ष करण्याऐवजी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलीस, संबंधित प्रशासन अथवा स्त्री आधार केंद्राला माहिती द्यावी,असे स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात स्वयंसेविका गर्दीच्या ठिकाणी महिलांना आवश्यक मार्गदर्शन करतील. महिलांची छेडछाड,गैरवर्तन,संशयास्पद हालचाली अथवा सुरक्षेशी संबंधित इतर समस्या आढळल्यास त्याची माहिती तत्काळ संबंधित यंत्रणां पर्यंत पोहोचविण्यासाठी त्या समन्वय साधतील.पीडित महिलेला मानसिक आधार देणे,तिच्या तक्रारीची गोपनीयता राखणे आणि योग्य मदतीपर्यंत पोहोचविणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

समिती सदस्य व स्वयंसेविकांनी प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता इतर महिलांपर्यंत पोहोचवावे. स्थानिक पातळीवरील समस्या, अनुभव आणि आवश्यक सूचना व्हॉट्सॲप समूहावर शेअर कराव्यात.यामुळे प्रत्येक भागातील परिस्थितीची माहिती मिळून गरजेनुसार तातडीची मदत आणि योग्य मार्गदर्शन करता येईल,असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

नियमित संवादासाठी व्हॉट्सॲप समूहाचा उपयोग करण्यात येणार असून अत्यंत तातडीच्या प्रसंगी समूहावरील उत्तराची वाट न पाहता पोलीस नियंत्रण कक्ष,महिला हेल्पलाइन अथवा संबंधित आपत्कालीन यंत्रणेशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमात पुणे शहर सायबर विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुंदे यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन केले.

ॲड.रेणुका देशपांडे यांनी महिलांचे कायदेशीर हक्क आणि उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांची माहिती दिली.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनीही महिला दक्षता समिती सदस्य व महिला सुरक्षा स्वयंसेविकांना मार्गदर्शन केले.

महिला सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.प्रशिक्षित महिला स्वयंसेविका समाज आणि यंत्रणा यांच्यामधील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात.त्यांनी धैर्य,संयम, गोपनीयता आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे,असे आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला दक्षता समिती सदस्य आणि महिला सुरक्षा स्वयंसेविकांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थित स्वयंसेविकांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी सजगतेने आणि जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

blank
blank

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *