
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी; २१०० रुपये देणगी
विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! ऑक्टोबरमधील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २७ सप्टेंबरपासून
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेची २७ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील पूजेसाठी २१०० रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ सप्टेंबर २०२६ :श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
तुळशी अर्चन पूजेसाठी २ हजार १०० रुपये देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत गर्दीचे तसेच सण-उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना ही पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना भाविकांना काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणीसाठी मदत व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पूजेबाबतची अधिक माहिती,अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
