
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ ऑक्टोबर २०२६ :राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपूर येथील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ही मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय,आगामी कार्तिकी यात्रेनिमित्त १४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मंदिर समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची सभा ८ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही सभा घेण्यात आली.
सभेला मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे,डॉ.दिनेशकुमार कदम,संभाजी शिंदे,ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर,ॲड. माधवी निगडे, नगराध्यक्षा सौ. डॉ.प्रणिती भगीरथ भालके,ह.भ.प.प्रकाश जवंजाळ,भागवत भूषण अतुल शास्त्री भगरे गुरुजी,ह.भ.प. शिवाजीराव मोरे,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा आणि आस्थापना विभागप्रमुख राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांसाठी दोन कोटींची मदत
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि गरजू नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांचे योगदान देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.त्यानुसार शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
१४ नोव्हेंबरपासून २४ तास विठ्ठल दर्शन
आगामी कार्तिकी यात्रा १० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यात्रेदरम्यान राज्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेतही दर्शन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी,आरोग्य सेवा, सुरक्षा,निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे,यासाठी संबंधित व्यवस्थांचा आढावा सभेत घेण्यात आला.
धार्मिक प्रथा-परंपरा आणि पूजेच्या व्यवस्थेचा आढावा
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदिरातील धार्मिक प्रथा-परंपरा, शासकीय महापूजा,मंदिर समिती मार्फत होणारी पाद्यपूजा,नित्यपूजा आणि भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचाही आढावा घेण्यात आला.
२०२७ च्या दिनदर्शिकेला आणि दैनंदिनी छपाईला मंजुरी
मंदिर समितीच्या सन २०२७ साठीच्या दिनदर्शिका आणि दैनंदिनी छपाईच्या विषयावरही सभेत निर्णय घेण्यात आला.तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पंढरपूर येथील पर्यटक निवासासाठी जागा उपलब्ध करून घेण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
WAVES ओटीटी व्यासपीठावर धुपारतीचे थेट प्रक्षेपण
प्रसार भारतीच्या सार्वजनिक सेवा आधारित WAVES ओटीटी व्यासपीठावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील धुपारतीचे विनामूल्य थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावास सभेत मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून मंदिरातील धार्मिक सोहळे अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मंदिराच्या मालमत्तेच्या व्यवस्थापना साठी मालमत्ता अधिकारी
मंदिर समितीच्या जमिनी आणि मालमत्तेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी नायब तहसीलदारांची मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
नाना पाटेकर आणि कर्मचारी तुकाराम कुलकर्णी यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मंदिर समितीचे कर्मचारी तुकाराम कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाल्याने सभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्तावही पारित करण्यात आला.
दरम्यान मंदिर समितीचे विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
सभेतील निर्णयांची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटींची मदत; १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन
पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटी रुपयांची मदत देणार. कार्तिकी यात्रेनिमित्त १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन सुविधा उपलब्ध होणार.
