
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांचा सामाजिक उपक्रम; शिरनांदगी येथे पशुधनाला दिलासा
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज :राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालक संकटात सापडले असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेती व्यवसाया सह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. पावसा अभावी चारा उपलब्धतेवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना जनावरांचे संगोपन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शक्य त्या पद्धतीने मदत मिळावी आणि त्यांच्या पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शिरनांदगी येथे चारा वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. अजितदादा पवार यांच्या निधनानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देणे ही काळाची गरज आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या परिसरातील गरजू शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी, अशी भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या कठीण काळात समाजातील विविध घटकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार, राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे चारा वाटप करण्यात आले.
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर पशुधन जगविण्यासाठी चारा आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजांचीही आवश्यकता असते. अशा वेळी स्थानिक पातळीवर होणारे मदतीचे उपक्रम शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरतात. शिरनांदगी येथील चारा वाटपाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमावेळी मुहम्मद उस्ताद, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे, बशीर शेख, हर्षवर्धन देशमुख, नासीर शेख, आबा खांडेकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश या चारा वाटप उपक्रमातून देण्यात आला.
