
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ कोटी रुपयांचा मदतीचा हात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द.डॉ.प्रणिताताई भालके, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांची उपस्थिती.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द; पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीला सामाजिक सेवेची जोड
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क :दुष्काळाच्या संकटाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उदात्त हेतूने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
राज्यातील विविध भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान आणि शेतीतील घटते उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशा कठीण परिस्थितीत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने मंदिर समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
विठ्ठलभक्तीला सामाजिक सेवेची जोड
पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे तीर्थक्षेत्र आहे. राज्यभरातून लाखो भाविक श्रद्धेने विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.भक्ती,श्रद्धा व सेवाभावाची परंपरा जपणाऱ्या मंदिर समितीने आता सामाजिक बांधिलकीचेही प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.
भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मंदिर समितीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. विठुरायाच्या नगरीतून संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हा हात पुढे आल्याने मंदिर समितीच्या सामाजिक योगदानाची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आलेला २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रथम नागरिक तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या डॉ.सौ. प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या सह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे,ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी,ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव उपस्थित आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या संकटात मंदिर समितीचा मदतीचा आधार
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती नव्हे, तर प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज असते. अशा वेळी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली २ कोटी रुपयांची मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मदतीचा उपयोग शासनाच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणार आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या या निर्णयातून धार्मिक संस्थांनी सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशील राहून समाजाच्या अडचणीच्या काळात पुढाकार घेण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे. विठुरायाच्या चरणी अर्पण होणाऱ्या श्रद्धेला समाजसेवेची जोड देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
