Wednesday, November 11

प्रत्येक दिवाळीत हुंडाबळीच्या घटना घडणे ही समाजासाठी वेदनादायी बाब; एकही लेक हुंड्याची बळी ठरणार नाही,तीच महाराष्ट्र व माझ्यासाठी खरी दिवाळी : डॉ. नीलम गोऱ्हे

IMG_20261108_162136


पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरातील श्रीरामनगर येथे पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली. पायल यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,महिला आघाडी संपर्कप्रमुख कांता पांढरे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, स्त्री आधार केंद्र संस्थेच्या अनिता शिंदे,आश्लेषा खंडागळे, मेघना गिडनावर आदी उपस्थित होते.

पायल यांच्या मृत्यूमागे हुंड्यासाठी छळ,मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल, मोबाईल संभाषणे, आर्थिक व्यवहार आणि इतर सर्व पुरावे तपासून सखोल चौकशी करण्यात यावी. तपासाच्या आवश्यकतेनुसार आरोपींच्या पोलीस कोठडीबाबत न्यायालयात योग्य भूमिका मांडावी. तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

पायल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान मुलीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने लक्ष घालून बालिकेच्या सर्वोत्तम हिताचा विचार करत तिचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवावी,अशी मागणी त्यांनी केली.

मी स्वतः एक आई आणि आजी आहे.त्या चिमुकलीला पाहून माझेही डोळे पाणावले.तिच्या आईला आपण परत आणू शकत नाही; मात्र तिचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,असे त्या म्हणाल्या.

या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मृतदेह आढळल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास किंवा अन्य कार्यवाहीत कथित दिरंगाई झाली असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मिळालेल्या जामिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. संबंधित न्यायालयीन आदेश तपासून कायदेशीर आधार असल्यास जामीन रद्द करण्यासाठी शासनाने सक्षम न्यायालयात अर्ज करावा, अशी मागणी त्यांनी केली.

IMG_20261108_222202



हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणांमध्ये आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पीडित कुटुंबीयांचे मनोधैर्य खचते. साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही विचार झाला पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

मुलीच्या माहेरच्या संपत्तीवर डोळा ठेवून तिच्यावर पैसे आणि मालमत्ते साठी दबाव आणणे ही गंभीर सामाजिक विकृती आहे.लग्न झालेली मुलगी म्हणजे एटीएम नाही.दुसऱ्याच्या कष्टाची संपत्ती ओरबाडून घेऊन कधीही लक्ष्मी प्रसन्न होत नाही,असे डॉ.निलम गोऱ्हे म्हणाल्या.

छळ होत असलेल्या मुलींना पुन्हा सासरी जाण्यासाठी दबाव टाकण्या ऐवजी त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे.आई-वडील,बहिणी आणि मैत्रिणींनी मुलींशी विश्वासाने संवाद साधून त्यांच्या पाठीशी उभे राहावे. तसेच लग्न समारंभांमध्ये केवळ नववधूलाच नव्हे, तर जावयालाही पत्नीचा सन्मान करण्याची शिकवण दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पायल झांबरे प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक महिला आणि ग्रामस्थांनी २० ते २२ सदस्यांची समिती स्थापन करावी. न्यायालयीन सुनावणीच्या वेळी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी समितीतील सदस्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन त्यांनी केले. स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यां कडूनही आवश्यक मदत केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

पायल झांबरे प्रकरणासह वैष्णवी हगवणे आणि शिल्पा गवारे कलाटे प्रकरणांतील तपास व न्यायालयीन प्रक्रियेची माहिती घेऊन महिलां वरील अत्याचार,हुंडाबळी आणि पीडित कुटुंबांच्या सुरक्षिततेचे प्रश्न डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

एका मुलीचा जीव गेल्यानंतर तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहेच; मात्र भविष्यात एकाही मुलीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेतला पाहिजे,असे आवाहन करत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पवार कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *