Tuesday, October 27

डोंगराळे प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे स्वागत; उच्च व सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही प्राधान्याने व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे

डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी साडेचार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील दोषी विजय खैरनार याला मालेगाव न्यायालयाने आज, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी फाशीची शिक्षा सुनावली.विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,ही घटना अत्यंत धक्कादायक आणि अमानुष होती. या गुन्ह्यातील क्रौर्यामुळे समाजमन सुन्न झाले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेला तपास, संकलित केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद यामुळे गुन्हा सिद्ध होऊ शकला. तपास अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सरकारी वकिलांच्या कामगिरीचे मी कौतुक करते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागाने न्यायालयीन स्वायत्ततेचा आदर राखून संबंधित न्यायालयीन यंत्रणेशी समन्वय साधावा. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे, सक्षम सरकारी वकिलांची उपलब्धता आणि प्रकरणांचा नियमित पाठपुरावा यासाठी ठोस व्यवस्था करावी, अशी मागणीही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली.

कठोर शिक्षेच्या निर्णयासोबतच पुढील कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला आणि मानसिक आधारालाही प्राधान्य दिले पाहिजे. न्यायासाठीची त्यांची प्रतीक्षा अनावश्यकपणे लांबू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *