Wednesday, October 28

महिलांनो, संकटाच्या वेळी घाबरू नका! ११२ वर फोन करताच मिळणार तातडीची पोलीस मदत- अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे

IMG_20260917_164019

अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे

शासकीय योजनांची जनजागृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवाद-२०२६ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी महिला सुरक्षेसाठी शासन आणि पोलीस प्रशासना कडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

महिलांवरील छेडछाड, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार किंवा प्रवासा दरम्यान निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यास पोलीस नियंत्रण कक्षामार्फत तातडीने मदतकार्य सुरू केले जाते. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे लोकेशन निश्चित करून परिस्थितीनुसार पोलीस गस्ती पथक किंवा स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचतात.

त्यामुळे महिलांनी संकटाच्या प्रसंगी मदत मागण्यास संकोच करू नये. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने ‘११२’ वर संपर्क करणे महत्त्वाचे असल्याचे प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

महिला सुरक्षेसाठी शासनाने विविध यंत्रणा आणि उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, महिला सहाय्यता कक्ष, महिला सुरक्षा समिती, विशेष समुपदेशन केंद्र, हेल्पलाइन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ आणि तक्रार निवारण समिती आदींचा समावेश आहे.

संकटाच्या परिस्थितीत महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, पोलीस प्रशासनाची मदत कशी घ्यावी आणि उपलब्ध यंत्रणांचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याबाबतही कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी विसर्जनाच्या वेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहनही अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. डॉल्बी आणि लेझर सिस्टीमवर अनावश्यक खर्च करण्याऐवजी गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चास मदत करावी, वृक्षारोपण आणि इतर सामाजिक उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचा उद्देश आणि स्वरूप याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास कासेगाव ग्रामस्थ, विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

महिला सुरक्षा, आपत्कालीन मदत व्यवस्था आणि शासनाच्या विविध सुरक्षा यंत्रणांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसंवाद-२०२६ च्या माध्यमातून करण्यात आलेली जनजागृती महत्त्वपूर्ण ठरत आहे.

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क असून आपत्कालीन प्रसंगी ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *