
श्री गौरी पूजनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल, रुक्मिणी माता व महालक्ष्मी मातेस पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
गौरी पूजनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारांची झळाळी; मनोहारी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

सोन्याचा मुकुट,चंद्रहार,लक्ष्मीहार अन् हिऱ्याचे कंगन; गौरी पूजना निमित्त विठ्ठल-रुक्मिणी - महालक्ष्मीचे विलोभनीय रूप
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ :श्री गौरी पूजना निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल,रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले.सुवर्ण अलंकारांनी नटलेले तिन्ही देवतांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, पितांबर, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्याचे कंगन जोड,मोत्याचा तुरा व शिरपेच,मत्स्य जोड,विविध पदरी माळा,लॉकेट,मोहर माळा, पुतळ्याची माळ,जवेची माळ, तुळशीची माळ,एकदानी आणि चंद्रहार आदी सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या व तोडे जोड, तारवड जोड, चिंचपेटी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची व पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी आणि कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले.

तर महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण, मोत्याची एकपदरी कंठी, पाचपदरी चंद्रहार, लक्ष्मी पेंडल लॉकेटसह, सातपदरी तांदळया हार, आठपदरी अष्टपैलू मण्याची कंठी आणि नेकलेस आदी अलंकार परिधान करण्यात आले.
या पारंपरिक सुवर्ण अलंकारांमुळे श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि महालक्ष्मी मातेचे रूप अधिकच तेजस्वी, मनोहारी आणि भक्तिमय दिसत आहे. देवतांचे हे विलोभनीय रूप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, भाविक भक्तिभावाने दर्शन घेत आहेत.याबाबतची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
