
संगमनेरमध्ये गुंठेवारीच्या ३०० प्रकरणांना वेग; दोन महिन्यांत पात्र अर्ज निकाली काढण्याचे सत्यजीत तांबे यांचे निर्देश
गुंठेवारीच्या नावाखाली नागरिकांचे हेलपाटे नकोत; सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
संगमनेर नगरपालिकेतील गुंठेवारीची ३०० ते ३५० प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांना अनावश्यक हेलपाटे टाळण्यासाठी मार्गदर्शन, मनुष्यबळ वाढवणे आणि मोजणीच्या अडचणी दूर करण्यावर भर.
संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ सप्टेंबर २०२६ :संगमनेर नगर पालिकेत गुंठेवारी अंतर्गत पूर्ण झालेल्या १० प्रकरणांतील प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मद भाई, मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक – नगरसेविका तसेच नगरपालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी गुंठेवारीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
संगमनेरमध्ये ३०० ते ३५० नागरिकांचे अर्ज
गुंठेवारी योजना ही अनधिकृत बांधकामे नियमानुसार अधिकृत करण्याची संधी देणारी प्रक्रिया आहे. संगमनेरमध्ये आतापर्यंत सुमारे ३०० ते ३५० नागरिकांनी गुंठेवारीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, अनेक अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने संबंधित प्रकरणे प्रलंबित आहेत.
अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती योग्य पद्धतीने देऊन त्यांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. नागरिकांना वारंवार नगरपालिकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने मार्गदर्शन करावे. पुढील दोन महिन्यांत पात्र असलेल्या सर्व प्रकरणांचा शक्य तितक्या वेगाने निपटारा करावा,असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
टाऊन प्लॅनिंग विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न
संगमनेर नगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग विभागात आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचेही तांबे यांनी निदर्शनास आणून दिले. विभागासाठी किमान पाच ते दहा कर्मचारी आवश्यक असताना सध्या मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच असिस्टंट टाऊन प्लॅनर यांच्यावर इतर नगरपालिकांचीही जबाबदारी असल्याने स्थानिक कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक कर्मचारी वर्ग राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जात असल्याने आवश्यक मनुष्यबळ मिळावे यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.
भूमिअभिलेख विभागाशी समन्वय साधणार
गुंठेवारीच्या प्रक्रियेत मोजणी संदर्भातील अडचणीही अनेकदा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाशी बैठक घेऊन मोजणीशी संबंधित प्रश्न सोडवण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढल्यास प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळू शकते.
अनधिकृत बांधकामे आणि चुकीच्या प्लॉटिंगवर स्पष्ट भूमिका
अनधिकृत बांधकामे, चुकीचे लेआउट आणि नियमबाह्य प्लॉटिंग यामुळे भविष्यात शहराच्या नियोजनबद्ध विकासाला अडथळा निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा तांबे यांनी मांडला.
नागरिकांनी जमीन खरेदी करण्या पूर्वी रस्त्याची रुंदी,आरक्षण, लेआउट आणि संबंधित शासकीय नियमांची माहिती तपासावी, असे आवाहन त्यांनी केले.केवळ कमी किमतीत जमीन मिळत असल्यामुळे नियमांकडे दुर्लक्ष करून व्यवहार करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
इंजिनिअर किंवा आर्किटेक्टच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनानेही दक्ष राहण्याची गरज असल्याचे तांबे यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी नगरपालिका अधिकारी किंवा कर्मचारी परवानगीच्या कामासाठी अवास्तव पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी थेट प्रशासनाकडे तक्रार करावी,असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांना विनाकारण नगरपालिकेच्या फेऱ्या नकोत
गुंठेवारीची प्रकरणे ही सामान्य नागरिकांच्या घराशी संबंधित आहेत.त्यामुळे कोणत्याही नागरिकाला विनाकारण नगरपालिकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत.पात्र प्रकरणे तातडीने निकाली काढून प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करावे,असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
तसेच नगरसेवक-नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील गुंठेवारी प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करावा. नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता, मोजणी तसेच अन्य अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
