Thursday, October 29

पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना; लाभ घेण्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन

गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणाला लोकहिताच्या संवादाची जोड देत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचविण्यासाठी लोकसंवाद-२०२६ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संभाजीनगर पंढरपूर येथील छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव तरुण मंडळात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नागरिकांना नगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना - शहरी अंतर्गत शहरातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी थेट आर्थिक अनुदान दिले जाते. पात्र नागरिकांनी संबंधित योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी नगरपालिका रुग्णालयां मध्ये उपलब्ध असलेल्या मोफत उपचार सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली.

सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना तसेच निराधार, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना याबाबतही जनजागृती करण्यात आली.

याशिवाय ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०’ आणि ‘नगरोत्थान महाभियान’ अंतर्गत शहरात नवीन अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा वाहिन्या, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वस्ती सुधार योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

IMG_20260925_222630


कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल आणि इंटरनेट हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यां साठी घातक ठरू शकतो, असे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय लेंडवे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अनावश्यक वेळ न घालवता मोबाईलचा वापर प्रामुख्याने अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी करावा. तसेच इंटरनेटचा वापर करताना वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक पंकज गाडेकर,माजी नगरसेवक अभिमन्यू साबळे,अनंता साबळे, पांडूरंग वरपे,गणेश परेदशी,रवी साबळे, अतुल जाधव,पैगंबर मणेरी, बापू देवकर, संदीप साबळे, ॲड. पुजारी, गणेश कोळी यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्याने पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रां सह संबंधित विभागाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *