
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम; मंगळवेढ्यात आदर्श शिक्षकांचा गौरव,आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती
शिक्षकांच्या मेहनतीचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; लक्ष्मी दहिवडीत रंगला प्रेरणादायी सोहळा

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा झाला.आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक हा प्रेरणादायी उपक्रम आहे. लक्ष्मी दहिवडी येथील कृष्णाई मल्टिपर्पज हॉलमध्ये मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास मंगळवेढा विधान सभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे तालिका सभापती समाधान आवताडे उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि त्यामागे शिक्षकांनी घेतलेले परिश्रम पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले. ज्ञानदानाचे कार्य करणारा प्रत्येक शिक्षक आपल्या परीने आदर्श असतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास देण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करतात, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षकांचा सन्मान आणि त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत आमदार आवताडे यांनी पुरस्काराने सन्मानित सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“आजचे गुणवंत विद्यार्थी ही उद्याच्या सक्षम समाजाची ताकद आहे,” असे सांगत शिक्षणाच्या बळावर स्वतःची प्रगती साधतानाच आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत आजच्या गुणवंत आणि कर्तृत्ववान युवा पिढीवर देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा परिषद उपपक्ष नेते प्रदीप खांडेकर, जिल्हा परिषद सदस्या करुणाताई शिवशरण, सभापती तथा उद्योजक आनंदशेठ ताड, सदस्य रमेश भांजे सावकार, राज्य शिक्षक नेते सुरेश पवार गुरुजी, उद्योजक जनार्धनदादा शिवशरण, पंचायत समिती सदस्य विनायकराव यादव, पंचायत समिती सदस्या जयश्रीताई कवचाळे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे सर, शिक्षक नेते धनंजय पाटील गुरुजी, शिक्षक नेते सतीश पवार गुरुजी, ॲड. शिवानंद पाटील, आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर सावत गुरुजी, माजी उपसरपंच दादासाहेब ताड, उद्योजक दीपक सुडके यांच्यासह शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि आदर्श शिक्षकांचा सन्मान या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.
