
अपयशावर मात करत सरकोलीच्या तरुणाने उभारले मोठे उद्योग साम्राज्य;निखिल भोसले यांचा सकाळ कडून सन्मान
पंढरपूरच्या सरकोली गावचे निखिल भोसले यांनी अपयशातून भरारी घेत उद्योगात यश मिळवले. 'सकाळ' माध्यम समूहाने त्यांचा विशेष गौरव केला असून जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास.
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज :सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातून आलेल्या निखिल भोसले यांनी उद्योजकता आणि समाजसेवेच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विशेष सरकारी वकील आणि खासदार ॲड.उज्ज्वल निकम आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ‘मराठा उद्योजकांची यशोगाथा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करून भोसले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

शिक्षण पूर्ण करून पुण्यात आल्यानंतर निखिल भोसले यांनी सुरुवातीला छोट्या नोकऱ्या केल्या. मात्र, तरुणांना रोजगार देण्याच्या ध्यासातून वयाच्या अवघ्या २३-२४ व्या वर्षी त्यांनी युपीएस आणि स्टॅबिलायझर उत्पादन करणारी पहिली कंपनी सुरू केली. तांत्रिक अडचणींमुळे ही कंपनी बंद पडली आणि आर्थिक संकट आले, तरीही खचून न जाता त्यांनी नव्याने उभारी घेतली.
त्यानंतर त्यांनी 'लिजंड कन्सेप्ट एन्फोर्समेंट', रिअल इस्टेटमधील भागीदारी संस्था आणि २०१८ मध्ये 'लेजीकॉन एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्या स्थापन करून बँकिंग सेवा, रिअल इस्टेट तसेच औद्योगिक ऑटोमेशन व आयात-निर्यात क्षेत्रात मोठा विस्तार केला.

उद्योग व्यवसायासोबतच त्यांनी 'उपासना फाउंडेशन'च्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, अडीच हजार महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत प्राथमिक दंतसेवा आणि कातकरी वस्त्यांवर थेट मदत पोहोचवत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या प्रवासात त्यांची पत्नी सौ.रमा, कन्या अनुज्ञा, चिरंजीव रणवीर आणि कुटुंबीयांची भक्कम साथ लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
