
सोलापूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १२ मंडळांना 'जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड'; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव
सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या १२ गणेश मंडळांना जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६ प्रदान;
सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज :सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्हास्तरीय शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या बैठका घेऊन No DJ, No Dolby, No Laser Light या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांनी पारंपरिक मिरवणुकां ऐवजी रक्तदान शिबिरे,वृक्षारोपण, जनजागृतीपर कार्यक्रम,रांगोळी व नृत्य स्पर्धा आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले. या सर्व उपक्रमांचा आढावा घेऊन प्रत्येक उपविभागातून एका उत्कृष्ट मंडळाची निवड करण्यात आली. अशा एकूण १२ गणेश मंडळांना पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकूण १२ गणेश मंडळांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र
आदर्श गणेश उत्सव मंडळ, मोहोळ – अध्यक्ष:संकेत गणेश मुंड़ासे
शिवप्रेमी तरुण मंडळ,बीबी दारफळ – अध्यक्ष: महेश दत्तात्रेय साठे
लोकमान्य गणेश मंडळ, अक्कलकोट – अध्यक्ष: मिलन मल्लप्पा कल्याणशेट्टी
श्री जगदंबा गणेश उत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळ कसबा पेठ,माढा – अध्यक्ष: महेश नारायण भांगे
आझाद गणेश मंडळ, बार्शी – अध्यक्ष:सुरज बाळासाहेब बरीदे
कोष्टी गल्ली गणेश मित्र मंडळ, टेंभुर्णी – अध्यक्ष: वैभव शशिकांत वाघावकर
शनिराज गणेश मित्र मंडळ, कुर्डूवाडी – अध्यक्ष:प्रतीक सोमनाथ शेंडगे
लोकप्रिय भैय्यू देशीय गणेश तरुण मंडळ, महिम ता.सांगोला – अध्यक्ष: गणेश दत्तात्रेय गोरवे
जय भवानी गणेश उत्सव मंडळ, नंदेश्वर, ता. मंगळवेढा – अध्यक्ष: विराज बिरा रूपनर
वक्रतुंड गणेश उत्सव तरुण मंडळ, इसबावी, पंढरपूर – अध्यक्ष: नितीन काशिनाथ लाड
आझाद तरुण मंडळ, आझादचा राजा, नातेपुते – अध्यक्ष: सिद्धार्थ सतीश जमदाडे
छावा ग्रुप गणेश मंडळ, नेवरे, ता. माळशिरस – अध्यक्ष:शेखर अशोक बोबडे

या कार्यक्रमावेळी सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांनी भविष्यातही गणेश मंडळांनी ध्वनीप्रदूषण टाळून, पर्यावरणाचे रक्षण करत सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन केले. या अभिनव उपक्रमामुळे उत्सवातून समाजसेवा आणि भक्तीतून पर्यावरण संवर्धन असा सकारात्मक संदेश जिल्हाभरात पोहोचला आहे.
