
पंढरपूरमध्ये नवरात्र महोत्सवाच्या ललित पंचमीला श्री विठ्ठल, रुक्मिणी माता आणि परिवार देवतांना पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख;मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली माहिती.
ललित पंचमीला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनमोहक रूप! रुक्मिणी मातेला वनदेवी पोशाख, सोन्या-मोत्यांच्या अलंकारांनी सजले देव
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर :श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात ललित पंचमीच्या पाचव्या माळेनिमित्त श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना पारंपरिक पोशाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले. यावेळी रुक्मिणी मातेला विशेष वनदेवी माता पोशाख परिधान करण्यात आला अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार नवरात्र महोत्सवात देवी-देवतांना विविध पारंपरिक पोशाख आणि अलंकारांनी सजविण्यात येते. ललित पंचमीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन अधिक आकर्षक झाले.
श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट आणि विविध अलंकारांचा साज
ललित पंचमीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट,कौस्तुभ मणी,मोठ्या दंडपेठ्यांची जोडी, मोत्याचा तुरा, दहा लोलक असलेला मोठा शिरपेच,दोन लोलक असलेला मोठा शिरपेच, चांदीचा मत्स्य, तोड्यांची जोडी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, दोन पदरी मोत्याची कंठी आणि इमिटेशन नेकलेस अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले.

रुक्मिणी मातेला वनदेवी माता पोशाख
माता रुक्मिणीला यावेळी वनदेवी माता पोशाख परिधान करण्यात आला.त्यासोबत सोन्याचा मुकुट, सोने-मोत्यांचे चांदवड,हिरवी चिंचपेटी,तोड्यांची जोडी,मोठी नथ, मोत्याचा कंठा आणि पैंजणांची जोडी असे पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
नवरात्रातील या विशेष सजावटीमुळे रुक्मिणी मातेच्या वनदेवी स्वरूपाचे दर्शन भाविकांना घेता येत आहे.
राधिका आणि सत्यभामा मातेलाही पारंपरिक अलंकार
मंदिरातील राधिका मातेला सिद्धेश्वर टोप, पुतळ्यांची माळ आणि जवाची माळ परिधान करण्यात आली. तर सत्यभामा देवीला नक्षीदार टोप, पुतळ्यांची माळ आणि जवाची माळ अशा अलंकारांनी सजविण्यात आले.
महालक्ष्मी मातेला सात पदरी तांदळाहार
महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, अष्टपैलू मण्यांची तीन पदरी कंठी, साखळ्यांची जोडी, सात पदरी तांदळाहार, लफ्फा, एक पदरी मोत्याची कंठी आणि चांदीची छत्री असे विविध अलंकार परिधान करण्यात आले.
श्री व्यंकटेशालाही अलंकारांचा साज
श्री व्यंकटेशाला प्रभावळीसह नक्षीदार टोप, नामनिळाचा, हिऱ्यांच्या कंगनांची जोडी, दंडपेठ्यांची जोडी, एक पदरी आणि दोन पदरी मोत्यांच्या कंठ्या, मारवाडी पेठ्यांच्या मोत्यांचा हार, तोरड्यांची जोडी, एक पदरी तुळशीची माळ आणि चांदीची काठी असे अलंकार परिधान करण्यात आले.
परिवार देवतांनाही पारंपरिक पोशाख
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अखत्यारीतील पंढरपूर शहर आणि परिसरातील परिवार देवतांनाही नवरात्र महोत्सवानिमित्त पारंपरिक पोशाख करण्यात येत आहेत. यामध्ये लखुबाई, अंबाबाई, पद्मावती,यल्लमादेवी तसेच यमाई- तुकाई माता आदी देवतांचा समावेश आहे.मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी ही माहिती दिली.
नवरात्र महोत्सवातील प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या पारंपरिक विधी आणि अलंकार सजावटीमुळे पंढरपूरच्या मंदिरातील उत्सवाला विशेष शोभा प्राप्त झाली असून भाविकांना श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे मंगलमय रूप अनुभवण्याची संधी मिळत आहे.
