
करमाळ्यात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; मोका कायद्यान्वयेही कारवाई
मुलीच्या विवाहाचे आमिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप; पुण्यातील तक्रारदाराची ६ लाखोंचा ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा दावा
करमाळा | ज्ञानप्रवाह न्यूज:मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.
मुलीच्या विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी विशाल जयसिंग मस्के वय ५०,व्यवसाय बांधकाम हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी परिसरात राहतात.त्यांच्या २८ वर्षीय मुलगी श्वेता हिच्या भविष्याबाबत आणि विवाहाबाबत माहिती मिळविण्या च्या उद्देशाने ते आरोपी मनोहर ऊर्फ मामा भोसले यांच्याकडे गेले होते.
त्यावेळी आरोपीच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारामार्फत फिर्यादी कडून सुरुवातीला पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.त्यानंतर मुलीच्या विवाहासंबंधी तसेच त्यांच्या पत्नीला उपसरपंच करण्यासाठी धार्मिक विधींच्या नावाखाली फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दैवी शक्तीचा वापर करण्याचे सांगितल्याचा आरोप
तक्रारीनुसार, आरोपीने आपण बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून आपल्यामध्ये देवी शक्ती असल्याचा दावा केल्याचा आरोप आहे. या शक्तीचा वापर करून फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह होण्यासाठी तसेच त्यांच्या पत्नीला उपसर्ग होऊ नये म्हणून मठामध्ये पूजा करावी लागेल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या कारणास्तव फिर्यादी यांच्याकडून एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी मठामध्ये बोलावून धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सदनिकेच्या भाडेव्यवहारातूनही फसवणूक झाल्याचा आरोप
फिर्यादी यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मांजरी परिसरात राहण्याची व्यवस्था करण्याच्या कारणास्तव दोन सदनिका भाड्याने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सदनिकांचे मासिक भाडे प्रत्येकी १२ हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून २० हजार रुपये देण्याचे ठरले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मात्र सदनिकांच्या भाड्याची आणि डिपॉझिटची रक्कम फिर्यादी यांना मिळाली नसल्याचा आरोप आहे. धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे घेणे आणि सदनिकांच्या भाडेव्यवहारातून झालेली कथित फसवणूक मिळून फिर्यादी यांची एकूण ६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई
मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतदेखील कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.
या तपासासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनात करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने व सहायक पोलीस निरीक्षक बाळाजी वळसणे कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधश्रद्धेच्या आमिषाला बळी पडू नका;पोलिसांचे आवाहन
अंधश्रद्धा व विविध आमिषांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
