Wednesday, October 28

पत्रकारितेत करिअरची नवी दिशा!पंढरपुरात नवोदित पत्रकारांसाठी विशेष वृत्तलेखन कार्यशाळा

ही कार्यशाळा रविवार २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंढरपूर येथील इंदिरा गांधी चौकातील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील डिजिटल तसेच मुद्रित माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांसह नवोदित पत्रकारांसाठी ही कार्यशाळा खुली राहणार आहे.

कार्यशाळेत पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास लक्ष्मण भासके तसेच अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू बाबासाहेब चंदनशिवे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वृत्तलेखनाची मूलभूत तत्त्वे, बातमीतील तथ्यांची मांडणी, प्रभावी शीर्षक लेखन,वृत्ताची रचना,वस्तुनिष्ठ पत्रकारिता, डिजिटल माध्यमांतील बदल आणि वाचकांपर्यंत प्रभावीपणे बातमी पोहोचविण्याचे तंत्र याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सध्याच्या काळात पारंपरिक मुद्रित माध्यमांसोबतच डिजिटल न्यूज पोर्टल,सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पत्रकारांना केवळ बातमी लिहिण्याबरोबरच डिजिटल माध्यमांसाठी योग्य पद्धतीने बातमी सादर करण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक झाले आहे.

या पार्श्वभूमीवर डिजिटल पत्रकारितेतील बदल, बातमीची मांडणी आणि आधुनिक माध्यमांच्या गरजा यावरही कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन मिळणार आहे.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे,जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव तसेच जिल्हाध्यक्ष आणि आयोजक सचिन कुलकर्णी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोन,लेखनकौशल्य आणि आधुनिक माध्यमांचे तंत्र समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील डिजिटल व मुद्रित माध्यमांमध्ये कार्यरत सर्व पत्रकार, पत्रकारिता क्षेत्रातील नवोदित आणि होतकरू तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

संपर्क : सचिन कुलकर्णी – ९०९६२५१२११ / ९४०३२९३२३६

पंढरपुरात २० सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळेचे आयोजन. नवोदित पत्रकारांना वृत्तलेखन, डिजिटल पत्रकारिता व बातमी मांडणीचे तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार.

पंढरपुरात २० सप्टेंबरला जिल्हास्तरीय वृत्तलेखन कार्यशाळा; नवोदित पत्रकारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *