
संगमनेर येथील प्रभा निवासस्थानी आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांनी घरच्या घरी हौद तयार करून गणेश विसर्जन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत जलप्रदूषण टाळण्याचे केले आवाहन
जलप्रदूषण टाळण्यासाठी तांबे परिवाराचा आदर्श! घरच्या हौदात गणरायाला भावपूर्ण निरोप
संगमनेर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १८ सप्टेंबर २०२६ :आज तांबे परिवाराने प्रभा या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात पर्यावरण पूरक पद्धतीने निरोप दिला.यावेळी आमदार सत्यजीत तांबे आणि संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ.मैथिली सत्यजीत तांबे यांनी घरीच हौद तयार करून त्यामध्ये गणरायाचे विसर्जन केले.
गेल्या पाच दिवसांपासून प्रभा निवासस्थानी गणरायाच्या आगमनामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

यंदाचा गणेशोत्सव तांबे परिवाराने साधेपणाने आणि पर्यावरणाची काळजी घेत साजरा केला. सार्वजनिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता प्रभा निवासस्थानीच स्वतंत्र हौद तयार करून त्यात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासोबतच घरच्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ.मैथिली तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवण्याचे आवाहन केले.गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा उत्सव असून उत्सवाची परंपरा जपत पर्यावरणाचे संरक्षण करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. घरच्या घरी हौद तयार करून गणरायाचे विसर्जन करण्यासारखे छोटे उपक्रमही पर्यावरण संवर्धना साठी महत्त्वाचे ठरू शकतात, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
