
स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’; मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या पुढाकारातून पंढरपुरात स्वच्छतेचा नवा संकल्प
पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० चंद्रभागा वाळवंटात ‘स्वच्छतेची विठ्ठलवारी’ अभियान; सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांना सहभागाचे आवाहन.
विठ्ठलनगरीत भक्तीचा नवा अध्याय,दर बुधवारी स्वच्छतेची विठ्ठलवारी,चंद्रभागा वाळवंटासाठी श्रमदानाचा संकल्प
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ :विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात.भक्ती,श्रद्धा आणि वारकरी परंपरेने नटलेल्या या पवित्र नगरीची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे.याच भावनेतून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर बुधवारी स्वच्छतेची विठ्ठलवारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्वच्छता हीच विठ्ठल सेवा,श्रमदाना तून भक्ती आणि सहभागातून स्वच्छता असा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून चंद्रभागा वाळवंट आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक,सामाजिक संस्था, संघटना,शाळा, महाविद्यालये तसेच विविध मंडळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
दर बुधवारी स्वच्छतेची विठ्ठलवारी
पंढरपूर नगरपरिषद आणि पंढरपुरातील विविध सामाजिक संस्था,संघटना,शाळा,महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने दर बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानाचे प्रमुख केंद्र चंद्रभागा वाळवंट असून श्रमदानाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार आहे. भाविकांसाठी पवित्र असलेल्या चंद्रभागा नदीकाठाचा परिसर अधिक स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
श्रमदानातून भक्ती,सहभागातून स्वच्छता
विठ्ठलभक्तीसोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.केवळ प्रशासनाच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवणे शक्य नसून नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे श्रमदानातून भक्ती आणि सहभागातून स्वच्छता या संकल्पनेला या अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे.
पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि सुंदर परिसर अनुभवता यावा तसेच स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्यपूर्ण जनजागृती निर्माण व्हावी,यासाठी सामाजिक संस्थां सह शैक्षणिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
चंद्रभागा वाळवंटासाठी सामूहिक पुढाकार
चंद्रभागा वाळवंट हे पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नियमित श्रमदानाची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर आणि भक्तिमय पंढरपूर या उद्दिष्टासाठी नगरपरिषदेसोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शाळा-महाविद्यालये , सामाजिक संस्थांचा सहभाग
या उपक्रमात पंढरपुरातील संस्था, संघटना,शाळा,महाविद्यालये आणि विविध मंडळांनी सहभागी होऊन आपला बुधवार स्वच्छतेसाठी राखीव ठेवावा, असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.सामाजिक सहभागातून स्वच्छतेची सवय निर्माण करणे आणि तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीशी जोडणे, हा या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.
सहभागी होण्यासाठी संपर्क
आपल्या संस्था,संघटना,शाळा, महाविद्यालय किंवा मंडळाचा बुधवार स्वच्छता अभियानासाठी राखीव करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधता येणार आहे. ऋषी आधटराव : ९३७०८ ५३२८५
