Tuesday, October 27

पंढरपुरात स्वच्छतेतून विठ्ठलसेवा अभियानाला लोकसहभागाची ताकद; ७०० जणांच्या श्रमदानातून १८ टन कचरा संकलित

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागाची वारी

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील चंद्रभागा नदीचे वाळवंट स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने विशेष स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल १८ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली.ही माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

IMG_20261015_124422

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यां पुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक,धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला.स्वच्छतेचा प्रश्न प्रशासनाच्या जबाबदारीपलीकडे जाऊन नागरिकांच्या सामूहिक कर्तव्याशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

पंढरपूर नगरपरिषद,गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत व शिष्य परिवार,चातुर्मासातील मंडळी, विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था,श्री सद्गुरू जोग महाराज गुरुकुल,श्री विठ्ठल आश्रम आणि खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आयोजित करण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत सुमारे ७०० जण सहभागी झाले. स्वयंसेवकांनी चंद्रभागा वाळवंटातील कचरा गोळा करत परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छते साठी सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित झाले.

संतांच्या पावन पावलांनी पवित्र झालेल्या चंद्रभागा वाळवंटात भाविक आणि स्थानिक नागरिकां कडून प्लास्टिक,निर्माल्य तसेच जुने कपडे टाकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत होती.या समस्येवर उपाय म्हणून नगरपरिषदेने नियमित स्वच्छता आणि जनजागृतीचा मार्ग स्वीकारला आहे.

IMG_20261015_124507

नदीकाठ आणि वाळवंट परिसर स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून प्रत्येक वारकरी,भाविक आणि पंढरीप्रेमी नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी दिला.

स्वच्छतेतून विठ्ठलसेवा हे अभियान केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता नियमित लोकचळवळ बनावी यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने दर बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत चंद्रभागा वाळवंटात श्रमदान मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.

पंढरपूरमध्ये विठ्ठलभक्तीला वारकरी परंपरेचे अधिष्ठान आहे. मात्र, भक्तीचा खरा अर्थ सार्वजनिक ठिकाणांप्रती जबाबदारी स्वीकारण्यातही आहे. दर्शनासाठी येताना परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिक आणि निर्माल्य नदीपात्रात न टाकणे, कचरा योग्य ठिकाणी जमा करणे आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, या छोट्या कृतींमधून मोठा बदल घडू शकतो.

१८ टन कचरा संकलित होणे हे अभियानाच्या व्याप्तीचे निदर्शक असले, तरी त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेची सवय समाजात रुजणे. चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली, तर पंढरीची पवित्रता आणि सौंदर्य जपण्याच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने बळ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *