Tuesday, October 27

स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ. डॉ.नीलम गोऱ्हे

IMG_20261017_223558

महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील के.बी.जोशी सभागृह, कर्वेनगर पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे संमेलन होणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ.गोऱ्हे आणि योगेश सोमण यांनी संमेलनाची माहिती दिली.यावेळी स्वाती महाळंक,प्रदीप निफाडकर उपस्थित होते.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारी निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ९९ नांदी संमेलनांच्या उपक्रमांतर्गत हे संमेलन होत आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष आहेत.उद्घाटन सत्रासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका मलिक अमर शेख, मंगला गोडबोले आणि योगेश सोमण यांनाही उद्घाटन सत्रासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

दुपारी १.४५ ते ३ या वेळेत कवयित्री संमेलन होणार असून त्यासाठी डॉ. प्रिया जामकर,सुप्रिया हळवे, विशाखा विश्वनाथ, डॅा.संगीता बर्वे, पद्मरेखा धनकर, योगिनी सातारकर पांडे आणि कल्पना दुधाळ यांना निमंत्रित केले आहे.अंजली कुलकर्णी सूत्रसंचालन करतील.

दुपारी ३ ते ४ या वेळेत माध्यमातील स्त्रीवादाचा आविष्कार या परिसंवादासाठी कल्याणी हर्डीकर, प्रतिमा कुलकर्णी, रोहिणी निनावे, किरण येले आणि डॉ. नैना कासखेडीकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पत्रकार राही भिडे या सत्राच्या सूत्रधार असतील.

दुपारी ४.१५ ते ५.३० या वेळेत मी का लिहिते ? या सत्रातून लेखिकांचा सर्जनशील प्रवास,अभिव्यक्ती मागील प्रेरणा आणि लेखन करताना येणाऱ्या अडचणींवर संवाद होईल.मुक्ता चैतन्य या सत्राच्या सूत्रधार असतील.समारोप सत्रात रेखा इनामदार साने, डॉ. कांता नलावडे,स्वाती महाळंक आणि डॉ.गोऱ्हे विचार मांडतील. डॉ.छाया महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाचा समारोप होईल.

स्त्रीला व्यक्त होताना कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक दृष्टिकोन आणि विविध अडथळ्यांमधून वाटचाल करावी लागते. त्यामुळे तिचा सर्जनशील प्रवास समजून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिकी करण, स्थलांतर आणि डिजिटल माध्यमांमुळे बदललेल्या अनुभव विश्वाचे प्रतिबिंबही या संवादातून समोर यावे, अशी अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

IMG_20261017_223453

संमेलनस्थळी स्त्री लेखिकांचे जीवनचरित्र आणि साहित्यिक योगदान उलगडणारे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.प्रदीप निफाडकर यांच्या संयोजनातून हे प्रदर्शन साकारले जात आहे. सुमारे २०० निमंत्रित प्रतिनिधींमध्ये लेखिका, प्राध्यापिका, कार्यकर्त्या आणि लेखनाची आवड असलेल्या महिलांचा समावेश असेल.

संमेलनाचे चित्रीकरण आणि थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.मी का लिहिते? आणि माध्यमांतील स्त्रीप्रतिमेसारख्या विषयांवरील चर्चांचे शक्यतेनुसार पुस्तिकेच्या स्वरूपात दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न राहील,असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या तरुण लेखिकांना आणि बाहेरगावच्या महिलांना शक्यतेनुसार ऑनलाइन जोडून घेण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलेला संधी देण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर,ही सूचना विचार करण्या सारखी असून संमेलनात विषय चर्चेला आल्यास त्यावर विचार केला जाईल,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.साहित्य,प्रसारमाध्यमे आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्व व निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नियोजित ९९ नांदी संमेलनांचा उपक्रम पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे योगेश सोमण यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचे भान राखून संमेलने साधेपणाने आणि काटकसरीने आयोजित करण्याच्या सूचना संयोजकांना देण्यात आल्या आहेत. शक्य तेथे अर्धदिवसीय संमेलने घ्यावीत, अतिरिक्त मंडप व अनावश्यक खर्च टाळून सभागृहांमध्ये कार्यक्रम करावेत आणि आशयपूर्ण परिसंवादांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

साधेपणा राखताना संमेलनांचा साहित्यिक दर्जा उत्तम राहील, याची काळजी घेतली जाईल. तसेच नांदी संमेलनांतील अध्यक्षीय भाषणांचे संकलन करून त्यांचा दस्तावेज तयार करण्याचे नियोजन असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

संमेलनाची माहिती अधिकाधिक नवोदित लेखिका,विद्यार्थिनी आणि साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *