Tuesday, October 27

मोबाईलच्या जगात हरवलेल्या नात्यांना जोडणारी कादंबरी; आईला निवृत्ती नाही मधून संस्कारांचा जागर

ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी या कादंबरीचा आढावा घेताना तिच्या आशयातील भावनिक खोली, साधी-सोपी भाषा,कौटुंबिक नात्यांचे चित्रण आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका यांचे विशेष महत्त्व अधोरेखित केले आहे.

कवितासागर साहित्य अकादमीचे संस्थापक संचालक डॉ.सुनील दादा पाटील यांनी अध्यापक,प्राध्यापक आणि प्राचार्य अशा विविध पदांवर काम करताना शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविण्याचा ध्यास जपला.शिक्षणाला वाचन संस्कृतीची जोड मिळाली, तर व्यक्तीच्या विचारविश्वात आणि समाजाच्या जडणघडणीत सकारात्मक बदल घडू शकतो, या भूमिकेतून त्यांनी गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रम राबविले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून पुस्तकांचे घर उभे केले आहे.या घरातील जवळपास प्रत्येक जागा पुस्तकांनी व्यापलेली दिसते.अगदी स्वयंपाक घरातील ओट्यावरही पुस्तके रचलेली आढळतात.

पुस्तकांविषयीची ही आत्मीयता केवळ संग्रहापुरती मर्यादित न राहता वाचक घडविण्याच्या चळवळीत रूपांतरित झाली आहे.

बालवाचकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके घरपोच उपलब्ध करून देणे आणि वाचलेल्या पुस्तकातून काय बोध मिळाला, याची नोंद लिहून घेणे हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम आहे.

या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होत असून त्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसते. पालकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.विशेष म्हणजे ही संकल्पना त्यांनी वैयक्तिक खर्चातून साकारली आहे.

आईला निवृत्ती नाही ही कादंबरी काल्पनिक पात्रांच्या माध्यमातून वास्तवातील कौटुंबिक प्रश्नांचे चित्रण करते. कादंबरीचा केंद्रबिंदू शांताबाई ही व्यक्तिरेखा आहे. तिच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या घटनांतून आईची भूमिका,तिचा त्याग,तिची सहनशीलता आणि कुटुंबाविषयीची बांधिलकी प्रभावीपणे समोर येते.

घराला खऱ्या अर्थाने घरपण देण्यासाठी एका स्त्रीला किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, याचे चित्रण लेखकाने सहज आणि ओघवत्या शैलीत केले आहे. घरातील कामांचा ताण असो, परिस्थितीची ओढाताण असो किंवा नात्यांमधील गुंतागुंत असो, शांताबाई प्रत्येक प्रसंगाला संयमाने सामोरे जाते.

तिच्या चेहऱ्यावरील हास्य, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आणि संकटांमध्येही न डगमगण्याची वृत्ती वाचकाला भावते.तिच्या पतीच्या आणि मुलांच्या व्यक्तिरेखांमधूनही नातेसंबंध, जबाबदारी आणि परस्पर समजूतदारपणाचे अनेक पैलू उलगडतात.

छोट्या-छोट्या घटनांतून मोठे जीवनमूल्य सांगण्याची लेखकाची हातोटी या कादंबरीत दिसून येते. त्यामुळे कथानकातील प्रसंग केवळ वाचून संपत नाहीत, तर वाचकाला स्वतःच्या कुटुंबाचा आणि वागण्याचा विचार करायला भाग पाडतात.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल मुळे जग जवळ आले आहे. संपर्क साधणे सोपे झाले आहे; परंतु प्रत्यक्ष संवाद आणि भावनिक जवळीक कमी होत असल्याची चिंता समाजात व्यक्त केली जाते. एकाच घरात राहणारी माणसेही अनेकदा आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे, सुख-दुःख वाटून घेणे आणि नात्यांमधील भावनिक बंध जपणे यासाठी आवश्यक असलेला वेळ कमी होत आहे.

कुटुंबव्यवस्थेतील संवाद हरवणे, पिढ्यांमधील अंतर वाढणे आणि नात्यांमधील जिव्हाळा कमी होणे या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आईला निवृत्ती नाही ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

आईच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी ओळखावी, नात्यांमध्ये संवाद जपावा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करावा,असा संदेश दिला आहे.घरातील संस्कारांचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर होतो आणि त्यातूनच व्यापक समाजाचे स्वरूप घडत असते,ही या कादंबरीची मध्यवर्ती जाणीव आहे.

या कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सहज, सुलभ आणि प्रवाही मांडणी.दैनंदिन जीवनातील प्रसंग,कौटुंबिक नात्यांतील बारकावे आणि भावनिक अनुभव लेखकाने साध्या शब्दांत मांडले आहेत. त्यामुळे कथानक वाचकाला सहज समजते आणि व्यक्तिरेखांशी भावनिक नाते निर्माण होते.

कादंबरी हातात घेतल्यानंतर पुढे काय घडते, हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम राहते. प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकायला मिळते, तर काही प्रसंग स्वतःच्या जीवनातील अनुभवांची आठवण करून देतात. वाचकाला अंतर्मुख करण्याची ही ताकदच कादंबरीचे यश अधोरेखित करते, असे सुभाष धुमे यांनी नमूद केले आहे.

चारशे पानांच्या या कादंबरीची छपाई आणि विषयाला अनुरूप मुखपृष्ठ यांचाही पुस्तकाच्या एकूण सादरीकरणात महत्त्वाचा वाटा आहे.

आई या विषयावर मराठी साहित्यात यापूर्वीही विपुल लेखन झाले आहे. तरीही आईला निवृत्ती नाही ही कादंबरी कौटुंबिक नात्यांचा विचार केवळ भावनिक पातळीवर करत नाही तर बदलत्या सामाजिक परिस्थितीत संस्कार, संवाद आणि वाचन संस्कृती यांची गरजही अधोरेखित करते.

घरातील संस्कार योग्य असतील, तर त्याचे प्रतिबिंब समाजात उमटते. कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले, परस्परांचा आदर केला आणि नात्यांमधील जिव्हाळा जपला तर सुसंस्कृत समाज निर्मितीचा पाया मजबूत होऊ शकतो.हा विचार कादंबरीच्या आशयातून प्रभावीपणे पुढे येतो.

डॉ.सुनील दादा पाटील यांनी ही कादंबरी साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे आहेत.प्रकाशिका संजीवनी बळवंत भिंगारे यांची कलात्मक दृष्टीही पुस्तकाच्या सादरीकरणातून जाणवते.

एकूणच,आईला निवृत्ती नाही ही कादंबरी आईच्या त्यागाची जाणीव करून देतानाच कुटुंबव्यवस्थेतील मूल्ये,हरवत चाललेला संवाद आणि समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा विचार करायला प्रवृत्त करते. वाचन संस्कृतीच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचा ध्यास घेतलेल्या लेखकाच्या प्रयत्नांना यश मिळावे आणि या कादंबरीतील विचार अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावेत, हीच अपेक्षा.

  • ग्रंथाचे शीर्षक: आईला निवृत्ती नाही
  • इंग्रजी शीर्षक : A Mother Has No Retirement
  • कादंबरीकार: डॉ.सुनील दादा पाटील
  • भाषा: मराठी
  • साहित्यप्रकार: कौटुंबिक व भावप्रधान कादंबरी
  • पृष्ठसंख्या: ४००
  • आवृत्ती: प्रथम आवृत्ती
  • ISBN: 978-93-95728-00-3
    प्रकाशिका: संजीवनी बळवंत भिंगारे
  • प्रकाशन संस्था: कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर
  • संपर्क:9975873569 / 8484986064
  • ई-मेल: sunildadapatil@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *