
नोकरीच्या मागे धावू नका, स्वतःचे उद्योग उभारा! व्होकल फॉर लोकल मधून विद्यार्थ्यांना जितेंद्र बाजारे यांचा उद्योजकतेचा मंत्र
पारंपरिक व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन; कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील दोन दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क:शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याची क्षमता विकसित करण्याचे माध्यमही आहे. ग्रामीण भागातील स्थानिक गरजा, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक ज्ञान यांचा योग्य वापर केला, तर अनेक नवे उद्योग उभे राहू शकतात. विद्यार्थ्यांनी व्होकल फॉर लोकल या संकल्पनेतून उद्योजक बनावे,असे आवाहन ज्येष्ठ लघुउद्योजक जितेंद्र बाजारे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय पंढरपूर येथे भारतीय ज्ञान परंपरा आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्होकल फॉर लोकल विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी IQAC समन्वयक डॉ.अमर कांबळे होते.
पारंपरिक व्यवसायांतून आधुनिक उद्योगांची संधी
मार्गदर्शन करताना जितेंद्र बाजारे म्हणाले की, ग्रामीण भागातील गरजा आणि स्थानिक संसाधने यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उद्योग निर्मितीचा विचार करावा. दूध, तूप आणि गोमूत्र यांसारख्या देशी गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर आधारित व्यवसायांना बाजारपेठेत संधी उपलब्ध आहे. पारंपरिक व्यवसायांकडे केवळ जुन्या पद्धती म्हणून न पाहता त्यात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि विपणनाची जोड दिल्यास नव्या उद्योगांची निर्मिती होऊ शकते.

विद्यार्थ्यांनी आव्हानांकडे अडथळे म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावे.स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवून त्यांचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करावे. पंढरपूर शहरातील धुळीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठीही विद्यार्थ्यांनी संशोधनातून नावीन्यपूर्ण कल्पना पुढे आणाव्यात,असे आवाहन त्यांनी केले.
२४ विभागांचे विद्यार्थी;बारा बलुतेदार-अठरा अलुतेदारांच्या व्यवसायांचे दर्शन
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे महाविद्यालयातील २४ विभागांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प.व्होकल फॉर लोकल संकल्पनेच्या आधारे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्या पारंपरिक व्यवसायांवर आधारित मॉडेल्स आणि माहितीपट विद्यार्थ्यांनी तयार केले होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक व्यवसायांची माहिती, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व तसेच आधुनिक काळातील त्यांची उपयुक्तता विविध प्रतिकृती आणि माहितीपटांच्या माध्यमातून मांडली. संशोधन, कल्पकता, चिकाटी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या सादरीकरणांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
मॉडेल्सचे परीक्षण डॉ.नागिन सर्वगोड आणि डॉ.विनया पाटील यांनी तर माहितीपटांचे परीक्षण डॉ.मोहन भोसले आणि डॉ.दादासाहेब हाके यांनी केले.
रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करा – डॉ.अमर कांबळे
अध्यक्षीय मनोगतात डॉ.अमर कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम करण्याबरोबरच त्यांच्यात स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. स्थानिक गरजांवर आधारित उद्योग उभारून रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे. केवळ रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी विकसित करावा, असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती आणि संयोजन
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयतमाऊली लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उपप्राचार्य डॉ.राजेश कवडे, पदव्युत्तर विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत,सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. मोहन भोसले, ग्रंथपाल डॉ.विनया पाटील,डॉ.नागिन सर्वगोड,डॉ. दादासाहेब हाके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता उपल्ली आणि प्रा.साधना कटकमवार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. धनंजय क्षीरसागर, प्रा.एम. एन. वनखंडे,प्रा.प्राजक्ता डोंबे,डॉ.विनया पाटील,प्रा.वर्षा गारोळे,प्रा.स्मिता आगलावे,डॉ.बापूसाहेब घोडके, डॉ.हर्ष घळके,अमोल माने, अभिषेक साळुंखे आणि संकेत यांनी परिश्रम घेतले.सहसमन्वयक डॉ.महादेव कोरी यांनी आभार मानले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
