Tuesday, October 27

मंगळवेढ्यात ४,७७७ रेशन कार्डांचा मुद्दा पेटला! प्रणिती शिंदे मैदानात; धान्यपुरवठा सुरू करण्याची मागणी

IMG_20261027_214231


मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित या आंदोलनाची सुरुवात दामाजी चौकातून मोर्चा काढून झाली. मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

बंद करण्यात आलेली रेशन कार्डे तातडीने पूर्ववत करावीत, पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळावे आणि रेशन कार्डांशी संबंधित प्रलंबित समस्या सोडवाव्यात, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यासंदर्भातील निवेदन पुरवठा निरीक्षक नवनाथ चव्हाण यांना देण्यात आले. आंदोलनात रेशन कार्डधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, मिशन सुधार अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात सुमारे ४,७७७ रेशन कार्डे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक गरीब,गरजू सर्वसामान्य कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.

काही लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड असूनही त्यांना नियमित धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच रेशन मिळण्यास पात्र असूनही काही कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नसल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

या समस्यांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

IMG_20261027_214320

आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळी परिस्थितीत रेशन कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला.त्या म्हणाल्या की, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्याची गरज अधिक आहे. अशा वेळी बंद करण्यात आलेली रेशनकार्डे पूर्ववत करून लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.

रेशन कार्डधारकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खासदार शिंदे यांनी दिला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संबंधित प्रकरणांची प्रत्यक्ष चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली.

आता या चौकशीतून किती रेशन कार्डे पूर्ववत होतात आणि संबंधित लाभार्थ्यांना नियमित धान्यपुरवठा कधी सुरू होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला.त्यांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांचा धान्यपुरवठा बंद होणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेशन कार्डधारकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. रविकिरण कोळेकर यांनी रेशन कार्डे बंद करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. लाभार्थ्यांची योग्य शहानिशा न करता आणि कार्डधारकांना विश्वासात न घेता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

IMG_20261027_214231

आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या: - मिशन सुधार अंतर्गत बंद करण्यात आलेली ४,७७७ रेशन कार्डे तपासून पात्र लाभार्थ्यांची कार्डे पूर्ववत करावीत.पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्यपुरवठा सुरू करावा.

  • रेशन कार्ड मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना कार्डे उपलब्ध करून द्यावीत.
  • रेशन कार्डधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करावे.
  • दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू देऊ नये.

या आंदोलनात मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. रविकिरण कोळेकर, मंगळवेढा शहराध्यक्ष ॲड.राहुल घुले,ॲड. दत्तात्रय खडतरे,नाथा ऐवळे,अर्जुन पाटील,सत्तार इनामदार,ज्ञानेश्वर सोरडीकर,महिला तालुकाध्यक्ष आयेशा शेख,अभिमन्यू तात्या बेद्रे, बजरंग चौगुले,दामाजी सलगर, आबा पाटील,अण्णासाहेब क्षिरसागर, शिवदास पुजारी, सुरेश चव्हाण आणि महादेव साखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते याशिवाय तालुक्यातील रेशन कार्डधारक महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवेढ्यातील ४,७७७ रेशन कार्डांचा प्रश्न केवळ प्रशासकीय नोंदींपुरता मर्यादित नसून, संबंधित पात्र कुटुंबांना नियमित अन्नधान्याचा लाभ मिळण्याशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची योग्य तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची कार्डे पूर्ववत करणे, तसेच धान्यपुरवठ्याबाबत स्पष्ट निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीतून किती कुटुंबांना दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *