Wednesday, November 11

सोलापुरात ४८ लाखांचा गांजा,दोन पोत्यांतून ४८ किलो अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

शहरात मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. गांजा दोन पोत्यांमध्ये साठवून विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. नियोजनबद्ध कारवाई करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यात ४८ किलो गांजा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी ४८ किलो गांजा,गांजा साठवण्यासाठी वापरण्यात आलेली दोन पोती आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.गांजाची बाजारातील अंदाजित किंमत ४८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सोलापूर शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघमारे यांनी या कारवाईची माहिती दिली.

या गांजाचा पुरवठा नेमका कुठून झाला,तो कोणाला विक्रीसाठी आणला होता आणि या व्यवहारा मागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का,याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *