
क्राइम न्यूज | पंढरपूर : पंढरपुरात गावठी पिस्तुलातून गोळीबार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रोहित उद्धव कडलासकर याला शहर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी चार दिवसांची कोठडी मिळवली आहे.
पंढरपुरात गोळीबार करून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न; नऊ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद!
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त;रोहित कडलासकरला चार दिवसांची पोलीस कोठडी
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.५ नोव्हेंबर : पंढरपूर शहरातील आंबाबाई पटांगण परिसरात गावठी पिस्तुलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.रोहित उद्धव कडलासकर वय २४,रा.अंबाबाई पटांगण पंढरपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकी घटना काय घडली ?
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरातील आंबाबाई पटांगण येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या काऊंटरजवळ महावीर ऊर्फ लल्या संजय अभंगराव वय ३३, रा.आंबाबाई पटांगण,पंढरपूर हे बसले होते. यावेळी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गोळीबारात महावीर अभंगराव हे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रोहित कडलासकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१) तसेच आर्म ॲक्ट कलम ३,२५ आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लातूर ते सोलापूरपर्यंत पोलिसांचा शोध
गोळीबाराच्या गंभीर घटनेनंतर आरोपीला तातडीने अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल यांनी तपासाला गती देऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला. तसेच त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन स्वतंत्र पथके तयार केली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी सुरुवातीला लातूर येथे आणि त्यानंतर सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे २ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून गोळीबारा साठी वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला रोहित उद्धव कडलासकर हा एमपीडीए कायद्यान्वये कारवाई झालेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंढरपूर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध शरीरा विरुद्धचे तसेच मालमत्तेसंबंधी एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.या गोळीबार प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी करीत आहेत.
या पोलीस पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी केली.या कारवाईत डी.बी.पथकातील पोलीस अंमलदार सुजित उबाळे, अनिल बनसोडे,गणेश पवार, सचिन हेंबाडे,अस्लम काझी,बापू मोरे,सुनील मोरे,शहाजी मंडले, हर्षद ठाकर आणि दीपक नवले यांनी सहभाग घेतला.
पंढरपूर शहरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेतील आरोपीला अवघ्या दोन दिवसांत अटक करून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
