
फक्त योजना सांगणार नाही, थेट लाभ मिळवून देणार; पंढरपूरमध्ये सेवा संकल्प अभियान चा शुभारंभ
पंढरपूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान ला सुरुवात.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर सरकारी योजनांचा लाभ, नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांवर प्रशासनाचा भर
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज:सरकारी सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच गावागावातील स्थानिक गरजा ओळखून विकासकामांना लोकसहभागाची जोड देण्यासाठी पंचायत समिती पंढरपूरच्या वतीने सेवा संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या शेतकी भवन सभागृहात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ शुभम आगावणे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. यावेळी प्रशासन, ग्रामपंचायत आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
एक महिना गावागावांत अभियानाची अंमलबजावणी
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. केवळ सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देणे हा या अभियानाचा उद्देश नसून, पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करणे, यावर प्रशासनाचा मुख्य भर राहणार आहे.

सरकारी योजना आणि विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती अनेकदा नागरिकांपर्यंत पोहोचते; मात्र योजनेचा लाभ मिळविण्या साठी आवश्यक कागदपत्रे, अर्जप्रक्रिया किंवा प्रशासकीय अडचणींमुळे काही नागरिक लाभापासून वंचित राहतात. ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.
योजना सांगण्यापेक्षा लाभ मिळवून द्या
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय ठेवून सरकारी योजनांचा लाभ तळागाळा तील शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचविता येईल, यासाठी अभियानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात सभापती डॉ शुभम आगावणे यांनी अभियानाचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले. त्यांनी अभियानाची सविस्तर रूपरेषा आणि नियोजित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

ग्रामपंचायत पातळीवर प्रशासनाची थेट उपस्थिती
या अभियानात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,नागरिक तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे गावातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अधिक थेट व्यासपीठ मिळणार आहे.
स्थानिक गरजांनुसार विकासाचा आराखडा तयार करणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, योजनांसाठी पात्र लाभार्थी शोधणे आणि प्रलंबित प्रशासकीय कामांना गती देणे या बाबींवर अभियानाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
अभियानाच्या यशासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी
सेवा संकल्प अभियान यशस्वी करण्यासाठी सचिव सोनकांबळे (स.प्र.अ.), शहाजहान तांबोळी (क.प्र.अ.), महेश वैद्य (वरिष्ठ सहाय्यक) आणि प्रताप बोंगाळे (तालुका समन्वयक) यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
गावपातळीवरील प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक झाल्यास सरकारी योजनांचा लाभ अधिक मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मिळू शकतो.त्यामुळे पुढील एक महिन्यात अभियानाच्या माध्यमातून किती नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळतो आणि किती प्रलंबित कामे मार्गी लागतात, याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.
