Thursday, October 29

सोलापुरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक;सोन्याचे दागिने, रोकड,मोटारसायकल जप्त

दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ते चार घरफोड्या करून चोरी केली होती.या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कासेगाव येथील घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.

तपासादरम्यान घटनेच्या मध्यरात्रीच्या सुमारास तीन संशयित व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिरताना दिसून आल्या. पोलिसांनी फुटेजचे विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमा तून माहिती मिळवली. त्यातून नितीन बाबू भोसले, कमलाकर यशवंत पवार आणि विरप्पा वेंकू शिंदे सर्व रा. बिस्मिल्लानगर मुळेगाव दक्षिण सोलापूर, यांच्याबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकाने बिस्मिल्लानगर मुळेगाव येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. यावेळी नितीन बाबू भोसले आणि कमलाकर यशवंत पवार हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. चौकशी केली असता त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तपासात आरोपींनी साथीदारांसह इतर गुन्हे केल्याचीही कबुली दिली. या कारवाईत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ तसेच माढा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ०१/२०२६ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालापैकी ३ ग्रॅम ४८ मिली सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपयांची रोकड, सुमारे ३ हजार रुपयांच्या साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व पथकातील पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अजय भोसले,पोकों/सागर ढोरे- पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, सुनंदा झळके, चापोकों / दिलीप थोरात तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोहवा / शशीकांत काळेकर यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *