
सरकोली पर्यटनस्थळाच्या विकासाला मोठी गती; नवीन पूल, चारपदरी रस्ता अन् पर्यटन सुविधांसाठी हालचाली
ड्रोन सर्व्हेनंतर सरकोलीच्या विकासाचा डीपीआर; रस्ते, पूल आणि पर्यटक सुविधांना मिळणार नवी दिशा
सरकोली कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाच्या विकासाला गती; रस्ते, नवीन पूल, चारपदरी मार्ग, पर्यटक निवास, नाना नाणी पार्क आणि इतर सुविधांसाठी शासकीय प्रक्रिया सुरू.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ सप्टेंबर २०२६ :सरकोली ता. पंढरपूर येथील कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाच्या विकासकामांना गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तहसीलदार मिनलताई सुधीर भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सचिव सुधीर साहेबराव भोसले, डाळिंब रत्न दत्तात्रय साहेबराव भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी सरकोली पर्यटनस्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
यावेळी कुटुंबीयांच्यावतीने सुरू असलेल्या नाना नानी पार्कच्या कामाची तसेच पर्यटनस्थळावरील विविध ठिकाणे,बागा आणि आतापर्यंत झालेल्या विकास कामांची पाहणी करण्यात आली.
रस्ते आणि पुलांच्या कामांना गती
सुधीर भोसले यांच्या पाठपुराव्या मुळे रांजणी ते शंकरगाव रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू असून सरकोलीजवळील खंडोबा मंदिर परिसरात नवीन पूल उभारण्यासाठी तसेच पुळूज बंधाऱ्याजवळ मोठा नवीन पूल उभारण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या भागातील पर्यटनस्थळांना जोडणारी दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.मगरवाडी–तारापूर–खरसोळी–पुळूज–वाडी–कोताळे–इंचगाव या मार्गादरम्यान चारपदरी रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

या विकासकामांसाठी मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांचे सहकार्य, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
पर्यटन सुविधांसाठी डीपीआर तयार होणार
सरकोली पर्यटनस्थळावर घाट, आरसीसी वॉल कंपाऊंड, पर्यटक निवास व्यवस्था आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले साहित्य भवन यांसह विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मागील आठवड्यात पर्यटनस्थळाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणाच्या आधारे आगामी विकासकामांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येणार आहे.
सरकोलीचा प्रगत पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश होण्याची अपेक्षा
तहसीलदार मिनलताई भोसले यांनी सरकोलीचा महाराष्ट्रातील प्रमुख प्रगत पर्यटनस्थळ गावांच्या यादीत लवकरच समावेश होण्याची अपेक्षा व्यक्त केली.आतापर्यंत झालेली कामे सुंदर आणि आकर्षक झाली असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.पर्यटनस्थळा च्या विकासासाठी श्रमदान करणारी टीमही मोठ्या मेहनतीने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकोली कृषी व तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ तसेच नवीन गावठाण परिसरात गावकऱ्यांच्या सूचनां नुसार विकासकामे करण्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असे भोसले कुटुंबीयांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे सरकोली परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा , दळणवळण व्यवस्था विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे अशी माहिती विलास श्रीरंग भोसले माजी पोलीस अंमलदार यांनी दिली.
