Thursday, October 29

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण

हे रक्तदान शिबिर भोर-वेल्ह्याचे माजी आमदार तसेच रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे जनक स्व.मा. संपतराव रामचंद्र जेधे आणि कै. सुमन संपतराव जेधे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते.

IMG_20260920_110050

या रक्तदान शिबिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले.रक्तदाना सारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्या बरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार या माध्यमातून करण्यात आला.

रक्तदानासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे आणि रक्तदानाची सामाजिक चळवळ अधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भविष्यात स्वतःला किंवा त्यांच्या कुटुंबातील गरजू व्यक्तींना रक्ताची आवश्यकता भासल्यास रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

IMG_20260920_110203

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोफत रक्तपिशवी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे योगदान केवळ त्या दिवसापुरते मर्यादित न राहता भविष्यातही गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपयोगी ठरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायरेश्वर येथे दरवर्षी तिथीनुसार ‘स्वराज्य संकल्प दिन’ साजरा केला जातो. त्याचबरोबर गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, क्रीडा तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

IMG_20260920_105937

गणेशोत्सवाच्या काळातही मागील अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासोबतच नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.

रक्तदान हा केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

आंबवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून समाजातील विविध घटक एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. ५७ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग घेतला.

IMG_20260920_110304

रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून केलेले रक्तदान एखाद्या गरजू रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकते. त्यामुळे निरोगी आणि पात्र नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्या साठी योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्त मंडळ आंबवडे यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

भोर तालुक्यातील आंबवडे येथे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्त मंडळाच्या रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांचे योगदान; रक्तदात्यांना ५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *