
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ : डॉ. बी. पी. रोंगे यांच्या शिक्षक भेटींना प्रतिसाद; टीईटी, जुनी पेन्शनसह प्रश्नांवर भर
पाच जिल्ह्यांत शिक्षकांशी थेट संवाद; डॉ. रोंगे यांनी जाणून घेतल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर डॉ.बी.पी.रोंगे यांच्या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक भेटींना प्रतिसाद. टीईटी, जुनी पेन्शन व सेवा विषयक प्रश्नांवर भूमिका.
कुर्डुवाडी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ सप्टेंबर २०२६ :राज्यातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या संदर्भात गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी गेल्या वर्षभरापासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर दिला आहे.
डॉ.बी.पी.रोंगे यांनी शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या, सेवा विषयक अडचणी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. या भेटींमध्ये शिक्षक व शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येत असून, विविध ठिकाणी त्यांचे स्वागत होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. रोंगे हे गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), कासेगाव येथील श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत. या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील शाळांना भेटी
गेल्या आठवड्यात डॉ. रोंगे यांनी माढा तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये कै. गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला, माढा, महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी, तुकाराम घाडगे विद्यालय, वरवडे, विनायक विद्यालय, वरवडे, न्यू इंग्लिश स्कूल, उंदरगाव आणि माध्यमिक आश्रम शाळा, केवड यांचा समावेश असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
३७ सेवा विषयक प्रकरणे निकाली काढल्याचा दावा
प्रसिद्धीपत्रकानुसार, सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीनंतर प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न मार्गी लागला.
तसेच सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, नियुक्ती आणि सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणांवर कार्यवाही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित विभागाने ही प्रकरणे निकाली काढल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे.
टीईटी आणि जुनी पेन्शन योजनेसह विविध प्रश्नांवर भूमिका
शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. बी. पी. रोंगे यांनी टीईटी, जुनी पेन्शन योजना तसेच शिक्षकांसमोरील इतर प्रश्नांचा अभ्यास केल्याचे सांगितले. शिक्षकांच्या समस्या शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांसमोर अनेक प्रश्न,अडचणी आणि समस्या आहेत. त्या शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडल्याचे नमूद केले आहे.
शिक्षकांसमोर अनेक प्रश्न,अडचणी आणि समस्या आहेत. त्यात काही शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष पगार मिळतो त्यातील काही भाग पुन्हा संस्थेला काहींना काही कारणाने परत द्यावा लागतो त्याबाबतही डॉ. बी.पी.रोंगे यांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील शिक्षकांशी सुरू असलेल्या या प्रत्यक्ष भेटी आणि संवादामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांच्या भूमिकेकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
