
पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांना मिळणार सुरक्षिततेचे आणि सन्मानाचे छत
पंढरपूरमध्ये प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी अपना घर’च्या नूतन वास्तूचा आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गृहप्रवेश. निराधार महिलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची सुविधा.
पालवी अपना घर च्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश; निराधार महिलांसाठी मायेचे छत उभे वैद्यकीय सुविधा, रस्ता व वीजपुरवठ्यासाठी सहकार्याची ग्वाही
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ सप्टेंबर २०२६ :पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने चंद्रभागा नदीकाठ, घाट तसेच शहरातील विविध भागांत निराधार आणि मनोरुग्ण व्यक्तींना सोडून देण्याचे प्रमाण असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत मनोरुग्ण, निराधार आणि आधाराची गरज असलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा व सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी संस्थेने उभारलेल्या पालवी अपना घर या नूतन वास्तूचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

गुरुवारी दि.१७ रोजी झालेल्या या गृहप्रवेश सोहळ्यात आमदार समाधान आवताडे आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पालवी संस्थेच्या सेवाकार्याचे कौतुक केले.निराधार महिलांसाठी मायेचे आणि हक्काचे छत निर्माण करणे हे अत्यंत अवघड कार्य आहे. पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा आणि डिंपल घाडगे यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे,असे त्यांनी नमूद केले.
मंगलताई शहा, त्यांची कन्या डिंपल, जावई,मुलगा,सून,नातू,नातसून अशा संपूर्ण परिवाराने या सेवाकार्याला वाहून घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.पालवी अपना घर च्या माध्यमातून मनोरुग्ण आणि निराधार महिलांना सुरक्षितता मिळण्याबरोबरच त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय सुविधा, रस्ता आणि वीजपुरवठ्यासाठी सहकार्य
आमदार समाधान आवताडे यांनीही पालवीच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. नातेवाईकांनी त्यागलेल्या, पिडित, मनोरुग्ण आणि निराधार महिलांना आधार देण्याचे कार्य ‘पालवी अपना घर’च्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. हे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेला भेडसावणाऱ्या वैद्यकीय सुविधा, रस्ता आणि वीजपुरवठा यांसारख्या अडचणी सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर, आमदार निधीतून तसेच वैयक्तिक पातळीवरून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही आमदार आवताडे यांनी यावेळी दिली.
सेवाभावी कार्याला विविध क्षेत्रातून उपस्थिती
या गृहप्रवेश सोहळ्यास क्रेडाई पंढरपूरचे पदाधिकारी, नगरसेवक लक्ष्मण शिरसाट,ॲड.सुनील वाळुजकर, ॲड.इंद्रजीत परिचारक, मनोज सुरवसे, संतोष डोंगरे, बापूसाहेब कदम, समाधान देठे यांच्यासह पालवी संस्थेचे आशिष शहा, अन्य विश्वस्त, समन्वयक तेजस घाडगे, पालवीतील सहकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.
पालवी अपना घर च्या माध्यमातून निराधार व मनोरुग्ण महिलांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात सेवाभावाचा आणखी एक आदर्श निर्माण झाला आहे.
