Thursday, October 29

IIT मुंबईतील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर रामदास आठवले आक्रमक; प्रा. डुल्लांना निलंबित करण्याची मागणी

रामदास आठवले यांनी शुक्रवारी IIT मुंबईला भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चौकशीबाबत माहिती घेण्यात आली. बैठकीला IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे, उपसंचालक रवींद्र गुडी,प्रा.मिलिंद अत्रे,रजिस्ट्रार गणेश बोरखडे, क्राइम ब्रँचचे एसीपी धर्मपाल बनसोडे यांच्यासह विविध अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

IMG_20260925_212626

त्यानंतर आठवले यांनी IIT मुंबईतील विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला भेट दिली.साहिल वाकोडे ज्या हॉस्टेल क्रमांक ४ मधील खोलीत मृतावस्थेत आढळले, त्या घटना स्थळाचीही त्यांनी पाहणी केली. हॉस्टेलमधील खोल्यांच्या स्थितीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्या समर्थनार्थ IIT कॅम्पसमध्ये काही कर्मचारी आणि प्राध्यापकांनी मोर्चा काढल्याचा उल्लेख करत, अशा प्रकारच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही आठवले यांनी भेट घेतली.यावेळी त्यांनी दिवंगत साहिल वाकोडे यांना श्रद्धांजली वाहिली.विद्यार्थ्यांनी IIT ने नेमलेल्या १० सदस्यीय चौकशी समितीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.

IMG_20260925_212547

दरम्यान उपलब्ध वृत्तांनुसार IIT मुंबईने प्रा.सूर्यनारायण डुल्ला यांना चौकशीच्या पार्श्वभूमीवर रजेवर पाठवले असून १० सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. मुंबई क्राइम ब्रँचकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आठवले म्हणाले की, देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार ही गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी संस्थात्मक पातळीवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साहिल वाकोडे प्रकरणात न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव आणि छळाचे आरोप केले आहेत तर IIT मुंबईने अशा प्रकारची कोणतीही औपचारिक तक्रार विद्यार्थ्याने SC/ST सेल किंवा प्रशासनाकडे केली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासणे हे सध्या सुरू असलेल्या तपासाचे महत्त्वाचे अंग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *