
संगमनेरच्या १३१ वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा मानाचा श्री इच्छापूर्ती गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात
संगमनेरच्या १३१ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेतील मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी गणरायाकडे प्रार्थना केली.
पारंपरिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि पर्यावरणपूरक विसर्जनाने सोहळ्याला विशेष रंगत आली.
संगमनेर, दि. २५ सप्टेंबर २०२६ : संगमनेर शहरातील १३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मानाच्या श्री इच्छापूर्ती गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील रंगार गल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाला यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

विसर्जन मिरवणुकीपूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्री इच्छापूर्ती गणरायाची आरती करण्यात आली.यावेळी गणरायाच्या चरणी वंदन करून आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या संकटातून महाराष्ट्राला सावरण्याची शक्ती मिळावी, तसेच सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी,अशी प्रार्थना केली.
संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची १३१ वर्षांची वैभवशाली परंपरा ही शहराच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. ही परंपरा जपणाऱ्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाचा वापर टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्याची मंडळाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे,काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

संगमनेरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ही १३१ वर्षांची परंपरा अशीच पुढेही दिमाखात सुरू राहावी, तसेच पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा आदर्श कायम राहावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
