Thursday, October 29

पंढरपुरात स्वच्छतेची विठ्ठलवारी उपक्रम; दर बुधवारी चंद्रभागा वाळवंटात श्रमदानातून स्वच्छतेची वारी

स्वच्छता हीच विठ्ठल सेवा,श्रमदाना तून भक्ती आणि सहभागातून स्वच्छता असा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून चंद्रभागा वाळवंट आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक,सामाजिक संस्था, संघटना,शाळा, महाविद्यालये तसेच विविध मंडळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

पंढरपूर नगरपरिषद आणि पंढरपुरातील विविध सामाजिक संस्था,संघटना,शाळा,महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने दर बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाचे प्रमुख केंद्र चंद्रभागा वाळवंट असून श्रमदानाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार आहे. भाविकांसाठी पवित्र असलेल्या चंद्रभागा नदीकाठाचा परिसर अधिक स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

विठ्ठलभक्तीसोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.केवळ प्रशासनाच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवणे शक्य नसून नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे श्रमदानातून भक्ती आणि सहभागातून स्वच्छता या संकल्पनेला या अभियानातून प्रोत्साहन दिले जात आहे.

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि सुंदर परिसर अनुभवता यावा तसेच स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सातत्यपूर्ण जनजागृती निर्माण व्हावी,यासाठी सामाजिक संस्थां सह शैक्षणिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

चंद्रभागा वाळवंट हे पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नियमित श्रमदानाची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर आणि भक्तिमय पंढरपूर या उद्दिष्टासाठी नगरपरिषदेसोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

IMG_20260930_065304


या उपक्रमात पंढरपुरातील संस्था, संघटना,शाळा,महाविद्यालये आणि विविध मंडळांनी सहभागी होऊन आपला बुधवार स्वच्छतेसाठी राखीव ठेवावा, असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.सामाजिक सहभागातून स्वच्छतेची सवय निर्माण करणे आणि तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीशी जोडणे, हा या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

आपल्या संस्था,संघटना,शाळा, महाविद्यालय किंवा मंडळाचा बुधवार स्वच्छता अभियानासाठी राखीव करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधता येणार आहे. ऋषी आधटराव : ९३७०८ ५३२८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *