
मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून महिलेला मारहाण; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तक्रार केली तर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू असा धमकीचा आरोप; मंगळवेढ्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा
मंगळवेढ्यात प्लॉटच्या वादातून आशा सुपरवायझर महिलेला मारहाण, शिवीगाळ व धमकी; गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून नेल्याचा आरोप. १२ जणांविरुद्ध BNS कलमांनुसार गुन्हा दाखल.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज :प्लॉटच्या वादातून एका महिलेला बोलावून शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेल्याचा प्रकार मंगळवेढा शहरात घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता राजू काळुंगे वय ४०, व्यवसाय आशा सुपरवायझर, रा.कचरेवाडी,ता.मंगळवेढा यांना दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.०० वाजता नगरपरिषद मंगळवेढा येथे बोलावण्यात आले होते. प्लॉटच्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी प्रविण खवतोडे याने फोन करून बोलावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या आरोपानुसार, तेथे प्रविण खवतोडे याने शिवीगाळ करून उपस्थित महिलांना मारहाण करण्यास चिथावणी दिली. त्यानंतर काही महिलांनी चप्पल, हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच काठी आणि खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत दीपक आवघडे याने गालावर चापट मारून खुर्ची फेकून मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तसेच सागर येताळ खरबडे, इंद्रजित तोंडसे आणि विशाल मारुती लोकरे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. प्रविण खवतोडे याने पोलिसांत तक्रार केल्यास खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीच्या वेळी अंबू तांबे व तिच्यासोबत असलेल्या महिलांनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचे मिनी गंठण ओढून तोडून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रविण खवतोडे,अंबू शशिकांत तांबे,जयश्री भंडारे, जयश्री भंडारे यांची आई,जयश्री नागनाथ आवघडे,मैना बाळू मस्के, चित्रा खरबडे,सिद्धू शिकतोडे, दीपक आवघडे,सागर येताळ खरबडे,इंद्रजित तोंडसे आणि विशाल मारुती लोकरे या १२ जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा BNS कलम 79, 118(1), 119(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2)(3), 190 अन्वये दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या तपासाची जबाबदारी पोहेकॉ/१६०३ कांबळे यांच्याकडे देण्यात आली असून गुन्हा पोहेकॉ/९०९ खंडागळे यांनी दाखल केला आहे.
दरम्यान हा गुन्हा दाखल होण्यास फिर्यादीकडून विलंब झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.
