
धोंडू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दत्तकला चे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज :करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का – MCOCA अंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि काळा जादू प्रतिबंधक गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व काळा जादू प्रतिबंध व निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असताना, मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले आणि त्याचा सहकारी विशाल उर्फ नाथबाबा वाघमारे यांना २५ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान, मनोहर मामाच्या मठातील अघोरी पूजा आणि पैशांचे व्यवहार पाहणारा आरोपी नरेंद्र बाळासाहेब सांगळे रा.वेळू,ता.श्रीगोंदा,जि.अहिल्या नगर यालाही अटक करण्यात आली.मनोहर मामाच्या सांगण्यावरून भक्तांकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात देणग्या उकळणारे व त्या रकमेची विल्हेवाट लावून ती कायदेशीर दाखवणारे असे एकूण २४ आरोपी तपासात निष्पन्न झाले आहेत.
दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पैशांची अफरातफर
तपासात समोर आलेल्या माहिती नुसार,आरोपी रामदास झोळ आणि माया झोळ यांची स्वामी चिंचोली ता.दौंड,जि.पुणे येथे दत्तकला शिक्षण संस्था आहे.या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मनोहर भोसलेच्या सांगण्यावरून पीडित लोकांकडून उकळलेली फसवणुकीची रोख रक्कम संस्थेत आणली जायची. तिथे ही काळी रक्कम कायदेशीर (White Money) करून ती पुन्हा मनोहर मामाला पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पैशातून मनोहर मामाने मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केली होती.
मोक्का अंतर्गत कारवाई
या टोळीच्या गुन्हेगारी आणि दहशतीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मोक्का कलमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे लागू करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास करमाळा उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा करत आहेत.
पोलिसांचे आवाहन:गोरगरीब नागरिकांना खोट्या आणि अघोरी पूजांचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कोणी अशा प्रकारे अघोरी पूजेच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा — अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
