
१९७४ पासूनची गणेशभक्ती! बसंत-पार्वती पासून सिल्व्हर रॉक्स पर्यंत डॉ.नीलम गोऱ्हेंची ५ दशकांची परंपरा
पाच दशकांची गणेशभक्ती आणि महिला नेतृत्वाचा संकल्प; सिल्व्हर रॉक्स मध्ये गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हेंचे साकडे
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२६ :गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर कुटुंबाला एकत्र आणणारी, सामाजिक सलोखा वाढविणारी आणि नव्या पिढीला संस्कारांची जोड देणारी परंपरा आहे.याच भावनेतून शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी श्री गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
या वेळी कुटुंबीय, नातेवाईक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरळीपासून पुण्यापर्यंत... पाच दशकांची परंपरा
डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कुटुंबातील गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पाच दशकांहून अधिक जुनी आहे.१९७४ मध्ये मुंबई वरळी येथील बसंत- पार्वती निवासस्थानी सुरू झालेली ही परंपरा आता पुण्यातील सिल्व्हर रॉक्स येथेही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे.
आमच्या जुन्या मुंबईतील बसंत- पार्वती निवासस्थानी सुरू झालेली घरगुती गणेशोत्सवाची परंपरा आता सिल्व्हर रॉक्स येथेही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे.सन १९७४ पासून आमच्या घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते.या परंपरेचा आम्हाला मनापासून अभिमान आहे,असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
गणरायाच्या चरणी विकास आणि सामाजिक सलोख्याची प्रार्थना
गणेशोत्सवाच्या निमित्ताने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्राची अधिक वेगाने प्रगती व्हावी आणि भारत अधिक सक्षम, समृद्ध व आत्मनिर्भर व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवामुळे समाजात उत्साह, सकारात्मकता आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते.कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणण्याचे कामही हा उत्सव करतो,असे त्यांनी नमूद केले.
कुटुंब छोटे असले तरी नव्या पिढीच्या सहभागामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. घरातील ही परंपरा पुढील पिढी कडूनही जपली जात असल्याचे समाधान आहे,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
गणेशोत्सवातून महिला नेतृत्वाचा संदेश
गणेशोत्सवाच्या धार्मिक वातावरणात सामाजिक आणि महिला नेतृत्वाचा मुद्दाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केला. राजकीय,सामाजिक आणि नागरी क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महिलांना निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळावी आणि नेतृत्वाची जबाबदारी अधिक व्यापकपणे मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महिला नेतृत्वाला मिळणारे महत्त्व तसेच राष्ट्रीय परिषदेत महिला राजकीय व सामाजिक नेतृत्वाच्या सक्षमीकरणाबाबत झालेल्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला.
महिलांचे राजकीय व सामाजिक नेतृत्व अधिक सक्षम होणे ही काळाची गरज आहे,असा संदेश त्यांनी यानिमित्ताने दिला.
सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे साकडे

श्री गणरायाच्या कृपेने राज्यातील आणि देशातील नागरिकांना सुखी, निरोगी, सुरक्षित आणि समृद्ध आयुष्य लाभावे,अशी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी केली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे आणि प्रत्येक कुटुंबात आनंद,समाधान व सलोखा नांदावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
नव्या पिढीचा सहभाग;कुटुंबाचा उत्साह कायम
घरगुती गणेशोत्सवाच्या आयोजनात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.गणेशमूर्ती,सजावट आणि उत्सवाच्या तयारीसाठी योगदान देणारे मूर्तिकार,कलाकार, सजावटकार, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या मेहनतीचेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.
सामाजिक बांधिलकीसह गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. गोऱ्हे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशदर्शनासाठी निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या अखेरीस डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा,परस्पर सहकार्य,पर्यावरण संवर्धन आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
एक परंपरा... अनेक संदेश
बसंत-पार्वती पासून सिल्व्हर रॉक्स पर्यंतचा हा प्रवास केवळ एका कुटुंबाच्या गणेशोत्सवाचा नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या संस्कारांचा, कुटुंबीयांच्या सहभागाचा आणि समाजहिताच्या संकल्पाचा प्रवास म्हणून पाहता येतो. श्रद्धेसोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि उत्सवासोबत महिला नेतृत्वाचा संदेश देत डॉ. गोऱ्हे यांच्या घरातील गणेशोत्सवाने यंदाही वेगळा सामाजिक संदर्भ अधोरेखित केला.
