
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला रामदास आठवले यांची भेट; दुरुस्ती व संवर्धनासाठी पाठपुरावा
लंडनमधील डॉ.आंबेडकर संग्रहालयाच्या संवर्धनासाठी रामदास आठवले यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला भेट दिली. स्मारकाच्या दुरुस्ती, संवर्धनासह व्हिडिओ दालनाची सूचना
लंडन / मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २० सप्टेंबर २०२६ :रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-स्मारकाला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारकाची पाहणी करून त्याच्या संवर्धन आणि देखभालीसंदर्भात काही सूचना मांडल्या.
लंडनमधील 10 King Henry’s Road हे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळ आहे. महाराष्ट्र शासनाने ही वास्तू संपादित केल्यानंतर येथे डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्यात आले. 14 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते.

भेटीदरम्यान आठवले यांनी संग्रहालय-स्मारकाच्या इमारतीची पाहणी केली. इमारतीची डागडुजी व दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय- स्मारकाच्या संवर्धन आणि देखभालीसाठी आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनकार्य आणि भाषणांचे व्हिडिओ दालन उभारण्याची सूचना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती अधिक प्रभावीपणे पर्यटक, विद्यार्थी आणि अभ्यासकांपर्यंत पोहोचावी, यासाठी संग्रहालयात त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहिती दालन उभारण्याची सूचना आठवले यांनी केली.
तसेच डॉ. आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणांसह त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांचे व्हिडिओ दाखविणारे स्वतंत्र दालन संग्रहालयात उभारण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
स्मारकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा अधिक व्यापक परिचय करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, अशी भूमिका या भेटीदरम्यान मांडण्यात आली.
डॉ. आंबेडकर संग्रहालयाला यापूर्वीही भारतीय उच्चायुक्तालयाने अभिवादन कार्यक्रमांसाठी भेट दिली आहे. उच्चायुक्तालयाच्या माहितीनुसार ही वास्तू 1921-22 दरम्यान डॉ.आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून मार्च 2020 मध्ये या ठिकाणाला संग्रहालयाचा दर्जा देण्यात आला.
यावेळी रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले,पुत्र जीत आठवले, चंद्रशेखर कांबळे, माधुरी चंद्रशेखर कांबळे, अविनाश कांबळे, माधुरी अविनाश कांबळे, गौतमी चंद्रशेखर कांबळे, दीक्षा चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.
