Thursday, October 29

पंढरपूरला स्वतंत्र RTO कार्यालयाचा मार्ग मोकळा? आ.समाधान आवताडेंच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभरात चार प्रमुख एकादशी उत्सवांच्या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतून लाखो भाविक येथे दाखल होतात. त्यामुळे शहरासह परिसरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे.

IMG_20261007_161637

याशिवाय पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, वाढता व्यापार, पर्यटन, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे तसेच अपर जिल्हाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयां सारख्या प्रशासकीय यंत्रणांमुळे शहराचे प्रशासकीय व आर्थिक महत्त्वही वाढले आहे.

पंढरपूरसह शेजारील तालुक्यांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वाहन नोंदणी,वाहन परवाना, कर भरणा,परवाना नूतनीकरण आणि परिवहन विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना सोलापूर येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडतात.

ही अडचण लक्षात घेऊन पंढरपुरात स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पंढरपुरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, तीर्थक्षेत्राचे महत्त्व आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार आवताडे यांच्या मागणीची प्रत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच परिवहन विभागाच्या आयुक्तांकडेही पाठविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिल्याने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.

पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. वाहन नोंदणी, परवाना आणि अन्य परिवहनविषयक प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होण्यास मदत होणार असून नागरिकांची सोलापूरला होणारी धावपळ कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *