
एक फोटो अपलोड करताना फक्त चेहरा जात नाही! ८० च्या ट्रेंड’वर ॲड.चैतन्य भंडारी यांचा गंभीर इशारा
१९८० च्या दशकातील फोटो ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल; थर्ड पार्टी ॲपवर फोटो अपलोड करण्याच्या धोक्याबाबत ॲड. चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज : सोशल मीडियावर सध्या जुन्या काळातील छायाचित्रांसारखा लूक देण्याचा, विशेषतः १९८० च्या दशकाचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाईपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण आपले फोटो विविध थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवर अपलोड करून त्यांना जुन्या काळातील लूक देत आहेत.मात्र हा ट्रेंड फॉलो करताना वैयक्तिक गोपनीयतेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा ॲड.चैतन्य भंडारी यांनी दिला आहे.
आज सोशल मीडियावर एखादा फोटो वेगळ्या स्टाईलमध्ये तयार करून घेणे अत्यंत सोपे झाले आहे. संबंधित ॲपमध्ये फोटो अपलोड करून विशिष्ट सूचना दिल्यानंतर काही क्षणांत त्या फोटोला १९८० च्या दशकातील छायाचित्रासारखा लूक दिला जातो. त्यामुळे आकर्षक आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो तयार होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात या ट्रेंडकडे आकर्षित होत आहेत.

मात्र,आपण केवळ एक फोटो अपलोड करत आहोत हा समज चुकीचा ठरू शकतो,असे ॲड. चैतन्य भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार अशा ॲप्लिकेशनवर फोटो अपलोड करताना चेहऱ्याची ठेवण,चेहऱ्या वरील हावभाव,डोळ्यांच्या हालचाली आणि चेहऱ्याशी संबंधित इतर माहिती ॲपच्या प्रक्रियेत जाऊ शकते.त्यामुळे भविष्यात या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटोच्या पलीकडे काय घेतले जाते ?
सोशल मीडिया ट्रेंडच्या नादात अनेकदा आपण एखाद्या ॲपला कोणत्या प्रकारची परवानगी देत आहोत, त्याची माहिती कुठे साठवली जाते आणि तिचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. आकर्षक फोटो तयार करण्याच्या उत्साहात नागरिकांकडून आपल्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक छायाचित्रांचा सहजपणे वापर केला जात आहे.
विशेषतः लहान मुले, कुटुंबातील सदस्य आणि खासगी क्षणांचे फोटो अशा ॲप्लिकेशनवर अपलोड करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
तरुणाईने ट्रेंडपेक्षा गोपनीयतेला प्राधान्य द्यावे
प्रत्येक सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करणे आवश्यक नाही.एखादा ट्रेंड व्हायरल झाला म्हणून त्यात सहभागी होण्यापूर्वी त्या ॲपची विश्वासार्हता,गोपनीयता धोरण आणि फोटो अथवा इतर माहितीचा वापर कसा केला जातो, याचा विचार करणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर फोटो टाकणे ही केवळ मजा नाही; डिजिटल जगात ती जबाबदारीही आहे,’ असा संदेश देत नागरिकांनी कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्लिकेशनला आपले किंवा आपल्या कुटुंबीयांचे फोटो अपलोड करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असे ॲड.चैतन्य भंडारी यांनी सांगितले.
८० चा ट्रेंड नको,डिजिटल सुरक्षितता हवी
सोशल मीडिया ट्रेंड काही दिवसांचा असतो; मात्र इंटरनेटवर एकदा अपलोड झालेली माहिती भविष्यात कुठे आणि कशा पद्धतीने वापरली जाईल, यावर आपले नियंत्रण राहीलच असे नाही. त्यामुळे केवळ ट्रेंडमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची गोपनीय माहिती धोक्यात घालू नये.
नागरिकांनी १९८० च्या ट्रेंडला बळी न पडता आपले वैयक्तिक आणि कौटुंबिक फोटो सुरक्षित ठेवावेत. थर्ड पार्टी ॲप्लिकेशनला फोटो देणे शक्यतो टाळावे आणि डिजिटल गोपनीयतेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
१९८० च्या दशकातील फोटो ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल; थर्ड पार्टी ॲपवर फोटो अपलोड करण्याच्या धोक्याबाबत ॲड. चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
