
अकलूज | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० सप्टेंबर २०२६ : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादीची आई व आजी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व सोन्याचे कर्णफुले चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच ३० मे २०२६ रोजी रात्री ११.३० ते ३१ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशनगर, ता. माळशिरस येथील घरासमोरून चार शेळ्या आणि पाच बोकडे चोरीला गेले होते. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विशाल मुगे व त्यांच्या पथकाने लवंग आणि गणेशनगर येथे घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार चैन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी टिल्ल्या उर्फ तेजस सोमनाथ जाधव, अर्जुन विजय चव्हाण,दोघे रा. स्वस्तिक वस्ती अकलूज, ता. माळशिरस, तसेच करण महादेव चव्हाण, रा. संग्रामनगर, अकलूज यांच्याबाबत माहिती मिळाली.
त्यापैकी टिल्ल्या उर्फ तेजस सोमनाथ जाधव हा अकलूज येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कर्मवीर चौक, अकलूज येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच्याकडून १ ग्रॅम ८८० मिली सोन्याचे दागिने, किंमत सुमारे २१ हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जनावर चोरीचाही गुन्हा उघड
गणेशनगर येथील जनावर चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत दीपक रामा काळे, रा. विजवडी, ता. माळशिरस, प्रल्हाद बाबू काळे आणि नितीन सरदार चव्हाण, दोघे रा. बाबरी पूल, अकलूज, ता. माळशिरस यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यापैकी दीपक रामा काळे हा विजय चौक, अकलूज येथे येणार असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दीपक रामा काळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे नमूद आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील दीपक रामा काळे याच्याविरुद्ध मोहोळ, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुगे तसेच पोलीस हवालदार मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल दोरकर, हरीश थोरात आणि बाळराजे घाडगे यांनी सहभाग घेतला.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! अकलूज परिसरातील चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीचे दोन गुन्हे उघड; सोन्याचे दागिने व १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; चैन स्नॅचिंगसह जनावर चोरीचे गुन्हे उघड,मुद्देमाल जप्त
अकलूजमध्ये पोलिसांचा सापळा; सोन्याचे दागिने आणि जनावर चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात
