Thursday, October 29

धुळ्यात २ ऑक्टोबरला खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.०,डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉडपासून हनी ट्रॅपपर्यंत तज्ज्ञ देणार मार्गदर्शन

२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बाबासाहेब कोतवाल हॉल, कोतवाल ट्रस्ट क्युमाईन क्लबसमोर,जेल रोड,धुळे येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

डिजिटल युगात नागरिकांसमोर निर्माण होणाऱ्या विविध सायबर धोक्यांबाबत कॉन्क्लेव्हमध्ये तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.यामध्ये डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉड, फिशिंग, म्युल अकाउंट, हनी ट्रॅप, बँक खाते फ्रीज होणे यांसह सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांचा समावेश आहे.

सायबर गुन्हा घडल्यानंतर काय करावे,ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी,फसवणुकी पासून स्वतःचे बँक खाते आणि डिजिटल माहिती कशी सुरक्षित ठेवावी, याबाबतही नागरिकांना उपयुक्त माहिती मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी,अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, सायबर तज्ज्ञ ॲड. चैतन्य भंडारी आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाची उपस्थितांना संधी मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशभर सायबर जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कार्यक्रमादरम्यान सायबर जागरूकता प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सायबर टॉक इंडिया एलएलपीकडून मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची संधी मिळणार आहे.

सायबर सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता धुळे पोलीस विभाग, सायबर जारगन एलएलपी आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या वतीने नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.
यासाठी मोबाईल ७७७४९७७७७९ / ८४१२९७५७४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *