
पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याची मागणी
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा; सत्यजीत तांबे यांचा शासनाला आग्रह
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत, पाणी, चारा, वीज आणि आवश्यक सवलतींचा लाभ वेळेत मिळावा,अशी मागणी केली.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीसाठी पाणी आणि वीजपुरवठ्यासह विविध उपाययोजनांना गती देण्याची गरज असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ :राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून दुष्काळी भागांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.
पावसाच्या कमतरतेमुळे अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. शेतीच्या उत्पादनाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थचक्रावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सवलती, मदत आणि आवश्यक सुविधांचा लाभ पात्र शेतकरी व नागरिकांना सहजपणे मिळावा,अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.
दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि वीजपुरवठा या बाबींना विशेष महत्त्व असते. परिस्थिती नुसार या सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले, तर ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. स्थानिक प्रशासनानेही परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीसोबतच पुढील हंगामासाठीही योग्य नियोजनाची गरज आहे. जलसंधारण,सूक्ष्म सिंचन, पाणी बचत आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यास मदत होईल, असे आमदार तांबे यांनी नमूद केले.
दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय हा शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी दिलासा देणारा टप्पा आहे. आता या निर्णयातून मिळणाऱ्या विविध सवलती आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात हीच अपेक्षा आहे.यासाठी आवश्यक ते प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा सुरू ठेवू, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
