Thursday, October 29

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी ९ ऑक्टोबरला मोर्चा; शासन आदेश काढण्याची मागणी

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कोल्हापुरातील बिंदू चौक येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मोर्चाचे नियोजन, मागण्यांची मांडणी आणि शासनाकडे करण्यात येणाऱ्या पाठपुराव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तातडीने कार्यान्वित करून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सभासद असलेल्या विक्रेत्यांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये वृद्ध झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना निवृत्ती वेतन लागू करावे, शासकीय घरकुल योजनांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, तसेच ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू झाल्यास वारसांना अंत्यविधीसाठी आर्थिक मदत मिळावी. तसेच विक्रेत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला अथवा महिला वृत्तपत्र विक्रेत्याच्या मृत्यूनंतर तिच्या विधुर पतीला आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

वृत्तपत्र वाटपाचे काम करत असताना विक्रेत्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, तसेच गंभीर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी पेपर स्टॉल उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात यावी. अस्तित्वात असलेले वृत्तपत्र स्टॉल अतिक्रमण म्हणून गृहीत धरू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्ते रुंदीकरण किंवा विकासकामांमुळे विद्यमान स्टॉल हलविण्याची वेळ आल्यास तो हटविण्यापूर्वी वृत्तपत्र विक्री व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पत्नींना तसेच महिला वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत मिळावी. विक्रेत्यांच्या मुलांच्या शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्यांचाही कल्याणकारी मंडळाच्या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तातडीने कार्यवाही करून शासन आदेश काढावा आणि मंडळ प्रत्यक्षात कार्यान्वित करावे, यासाठी ९ ऑक्टोबरच्या मोर्चात राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *