Thursday, October 29

शरद कोळी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई; येरवडा कारागृहात स्थानबद्ध

शरद विठ्ठल कोळी हा अर्धनारी ता. मोहोळ जि.सोलापूर येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न,खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी यांसह गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे गुन्हे पंढरपूर तालुका, सांगोला, कामती,मंगळवेढा आणि मंद्रूप पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असून नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वी त्याच्यावर कायदेशीर तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.मात्र त्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण केल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

शरद कोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून शरद कोळी यास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळीचा शोध घेतला. त्याला सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे करणारे, वाळू तस्करी तसेच अवैध दारू विक्री करणारे सराईत गुन्हेगार यांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहेत. अशा गुन्हेगारांविरुद्ध भविष्यातही MPDA कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल,असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल वि.कुलकर्णी यांनी दिला आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कर्ष देवकुळे, विलास म्हेत्रे यांनीही प्रक्रियेत सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *